Fri, May 29, 2020 12:50होमपेज › None › कर्जफेडीची मुदत वाढवा; राहुल गांधींचे रिझर्व बँकेला पत्र

कर्जफेडीची मुदत वाढवा; राहुल गांधींचे रिझर्व बँकेला पत्र

Published On: Aug 14 2019 6:13PM | Last Updated: Aug 14 2019 6:13PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केरळमधील शेतकर्‍यांना कर्जाची परतफेड करण्यासाठीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांना लिहिले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी वायनाड येथील पुरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.

राहुल गांधी यांनी पत्रात केरळच्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी केरळमध्ये शतकातील सर्वांत भीषण महापूर आला होता. केरळमधील पुरामुळे शेतकर्‍यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिके नष्ट झाली आहेत. केरळमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा अचानक वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जाची परतफेड करण्याची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवून देण्यात यावी, असे मी रिझर्व बँकेस आवाहन करतो, असे राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले आहे. 

यापूर्वी राहुल गांधी केरळमधील वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या दौर्‍यावर होते. मतदारसंघातील पुरग्रस्तांना सर्व प्रकारची मदत पुरविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते.