अस्थाना प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला दोन महिन्यांची मुदतवाढ

Last Updated: Oct 09 2019 5:03PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सीबीआयचे तत्कालीन विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करण्यासाठी दिल्‍ली उच्च न्यायालयाने सीबीआयला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 

विशेष संचालकपदावर असताना राकेश अस्थाना यांनी लाच घेतल्याचा गंभीर आरोप झालेला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जावी, अशी विनंती सीबीआयकडून करण्यात आली होती. त्यावर न्यायमूर्ती विभू भाकरु यांनी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली. 

तपासाच्या अनुषंगाने काही कागदपत्रे अमेरिका आणि संयुक्‍त अरब आमिरातीला पाठविण्यात आली आहेत. या कागदपत्रांवर अजूनपर्यंत उत्‍तर आलेले नाही. परिणामी तपासासाठी मुदतवाढ दिली जावी, अशी विनंती अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांनी सीबीआयची बाजू मांडताना केली. 

चौकशीला मुदतवाढ देण्यास अस्थाना यांच्यासह देवेंदर कुमार आणि उद्योगपती मनोज प्रसाद यांच्या वकिलांनी विरोध केला. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली.