अमेरिकेत मुस्लिम, ज्यू आणि शीख हेट क्राइमचे सर्वांधिक बळी!

Last Updated: Nov 19 2019 1:31AM
Responsive image


वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था अर्थात फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) २०१८ मध्ये ‘हेट क्राइम’ म्हणजेच द्वेष अपराध प्रकरणांचा अहवाल तयार करून त्याचा डेटा प्रसिद्ध केला. त्यानुसार, मागील वर्षी अमेरिकेत वैयक्तिक तिरस्काराच्या गुन्ह्यांची टक्केवारी १६ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. एफबीआयच्या मते, एका वर्षात लॅटिन वंशाच्या लोकांविरुद्ध सर्वाधिक हेट क्राईम घडले. त्याचवेळी मुस्लिम, ज्यू आणि शीख देखील मोठ्या संख्येने हेट क्राइमचे बळी ठरले. शिखांविरूद्ध हेट क्राईमच्या प्रकरणांमध्ये २०१७ ते २०१८ दरम्यान ३ पटींनी वाढ झाली आहे.

सर्वाधिक हेट क्राईम ज्यू धर्मीय नागरिकांविरोधात 

एफबीआयच्या वार्षिक अहवालानुसार २०१७ मध्ये शीख नागरिकांविरोधात २० हेट क्राईमच्या घटना घडल्या. परंतु, २०१८ मध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या ६० वर पोहोचली. अमेरिकेत सर्वाधिक हेट क्राईमच्या घटना ज्यू धर्मीय नागरिकांविरोधात घडल्या. हेट क्राईमची ही टक्केवारी ५६.९ इतकी आहे. तर, १४.६ टक्के घटना या मुस्लिम नागरिकांविरोधात घडलेल्या आहेत. त्यानंतर हेट क्राईमच्या ४.३ टक्के घटना या शीख धर्मीय नागरिकांविरोधात घडल्या आहेत. 

लॅटिन वंशाच्या लोकांविरुद्ध सर्वाधिक हेट क्राईम घडले आहेत. त्यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये ४३० तर, २०१८ मध्ये हेट क्राईमच्या ४८५ घटना घडल्या. दरम्यान, मुस्लिम आणि अरब नागरिकांविरुद्ध हेट क्राईमच्या २७० घटना घडल्या. 

वैयक्तिक हेट क्राईमच्या घटनांमध्ये वाढ 

२०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये हेट क्राईमच्या घटनांमध्ये किरकोळ घट झाली असून ही आकडेवारी ७१७५ वरून ७१२० पर्यंत कमी झाली आहे. यापूर्वी, २०१६ ते २०१७ दरम्यान हेट क्राईममध्ये जवळपास १७ टक्क्यांनी वाढ झाली होती. या वेळी मालमत्तेविरूद्धची गुन्हेगारी कमी होत असताना, लोकांवर वैयक्तिक हल्ल्यांचे प्रमाण वाढले. हेट क्राईमच्या एकूण ७१२० घटनांपैकी ४५२१ (६१ टक्के) घटना या वैयक्तिक हेट क्राईमच्या घटना आहेत.