Tue, Feb 18, 2020 00:37होमपेज › None › खूशखबर! ‘पीएफ’वर आता 8.65 टक्के व्याज

खूशखबर! ‘पीएफ’वर आता 8.65 टक्के व्याज

Published On: Sep 17 2019 10:24PM | Last Updated: Sep 17 2019 10:24PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) 6 कोटींहून अधिक संख्येने असलेल्या सदस्यांसाठी खूशखबर आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रॉव्हिडंट फंडावरील व्याज दरवाढीला मंजुरी दिली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.65 टक्के दराने व्याज मिळणार आहे. केंद्रीय रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी ही ‘गुड न्यूज’ दिली.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज्ने गत आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के व्याज दरवाढीच्या प्रस्तावाला फेब्रुवारीमध्येच मंजुरी दिलेली होती. नंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला गेला होता. ‘ईपीएफओ’च्या 6 कोटींहून अधिक संख्येने असलेल्या सदस्यांना 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जमा रकमेवर 8.65 टक्के व्याज मिळणार आहे, असे गंगवार यांनी सांगितले. 

सद्य:स्थितीत ईपीएफओ खात्यांमधील दाव्यांचा निपटारा 8.55 टक्के व्याज दराने केला जात आहे. हे दर 2017-18 या आर्थिक वर्षासाठी होते. या वर्षातील व्याज दर पाच वर्षांतील सर्वांत कमी होते. 2016-17 मध्ये व्याज दर 8.65 टक्के, 2013-14 आणि 2014-15 मध्ये कर्मचार्‍यांना 8.75 टक्के व्याज दर दिला जात होता. 2012-13मध्ये 8.5 टक्के व्याज दर देण्यात आला होता.