लाभाच्या पदाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास क्रिकेटर तयार 

Published On: Aug 19 2019 1:29AM | Last Updated: Aug 18 2019 9:34PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


मुंबई : क्रीडा प्रतिनिधी

बीसीसीआयच्या मुख्यालयात होणार्‍या अनौपचारिक बैठकीदरम्यान विवादास्पद लाभाच्या पदाच्या मुद्द्यावर माजी क्रिकेटपटू चर्चा करणार आहेत. अनेक आघाडीचे क्रिकेटर या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये प्रशासकीय समितीमधील (सीओए) कमीत कमी एक सदस्य उपस्थित असेल. या मुद्द्यावर मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.

विनोद रायच्या अध्यक्षतेखाली सीओएचे अन्य सदस्य डायना इडुल्जी व सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल रवी थोडगे यांचा समावेश आहे. माजी भारतीय फलंदाज दिलीप वेंगसरकर व जलदगती गोलंदाज अजित अगरकर बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्‍चित समजले आहेत. यासोबत व्हीव्हीएस लक्ष्मण व राहुल द्रविडदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, सचिन तेंडुलकर या बैठकीचा भाग नसेल, अशी माहिती मिळत आहे. माजी भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंगने सोमवारच्या बैठकीत सहभागी होणार नाही; पण त्यांनी आपले मत बोर्डाला पत्राद्वारे कळवले आहे.

हल्लीच लाभाच्या पदाच्या मुद्द्यावर माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड याला नोटीस पाठविण्यात आली होती. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे मानद सदस्य संजीव गुप्‍ताद्वारे केलेल्या तक्रारीनुसार द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सदस्य आहे आणि तो इंडिया सिमेंटस् ग्रुपमध्ये उपाध्यक्षपदावर कार्यरत आहे; पण सीओएला द्रविडने एनसीएने क्रिकेट प्रमुखपदाच्या रूपात नियुक्‍ती स्पष्ट करताना लाभाच्या पदाचा मुद्दा रद्द केला. थोडगे यांनी 13 ऑगस्टला सांगितले की, बीसीसीआयने लोकपाल आणि आचरण अधिकारी डी. के. जैन यांच्या हातात निर्णय आहे. याप्रकरणी ते अंतिम निर्णय घेतील. यासोबतचा भारताचा सहयोगी स्टाफ निवडण्याची प्रक्रिया बीसीसीआयच्या मुख्यालयात सोमवारपासून सुरू होईल व गुरुवारपर्यंत चालेल.