Fri, Nov 22, 2019 07:22होमपेज › None › तीन लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना मिळणार विमा कवच?

तीन लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना मिळणार विमा कवच?

Last Updated: Oct 16 2019 5:38PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बँकांमधील ठेवींना विमा कवच उपलब्ध करून देणार्‍या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) आगामी काळात तीन लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना विमा कवच उपलब्ध करुन देण्याचा विचार चालविला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र बँक अर्थात पीएमसीमधील प्रचंड घोटाळ्यानंतर जनतेच्या बँकांतील ठेवींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

पीएमसी बँकेच्या तीन खातेदारांचा मृत्यू झाल्यामुळे बँक ठेवीदारांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे. 

बँकांमधील ठेवींना विम्याचे कवच उपलब्ध करुन देण्याचे काम डीआयसीजीसी करते. डीआयसीजीसीकडून सध्या एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना विम्याची सुरक्षा दिली जाते. ही मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याच्या अनुषंगाने डीआयसीजीसी अर्थ मंत्रालयाशी चर्चा करीत आहे. 

ठेवींना विम्याचे कवच देण्याची मर्यादा वाढविताना डीआयसीजीसीला रिझर्व्ह बँकेचे मतदेखील विचारात घ्यावे लागणार आहे. 

जुलै १९८० ते मे १९९३ या काळात ३० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे कवच दिले जात आहे. ९३ साली ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. तेव्हापासून ही मर्यादा तेवढीच आहे. विम्याचे कवच घेण्यासाठी डीआयसीजीसीकडे ज्या बँकांनी नोंदणी केलेली आहे, त्यात १९४१ सहकारी बँका तसेच १५७ व्यापारी बँकांचा समावेश आहे. 

डीआयसीजीसी ही रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारितील उपकंपनी आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये डीआयसीजीसीकडे विमा संरक्षणासाठीचा १२ हजार ४३ कोटी रुपयांचा प्रिमीयम जमा झाला होता.