Tue, Jul 07, 2020 07:20होमपेज › None › 'यामुळे' पी. चिदंबरम तिहार जेलमधून खूपच चिंतेत

'यामुळे' पी. चिदंबरम तिहार जेलमधून खूपच चिंतेत

Published On: Sep 11 2019 6:48PM | Last Updated: Sep 11 2019 6:48PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे खूपच चिंतेत असल्याचे दिसत आहे. त्यांनी तिहार तुरुंगातून ‘आपण अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून खूप चिंतेत असल्याचे ट्विट करत भावना व्यक्त केली. 

आयएनएक्स मीडीया घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या चिदंबरम यांची तिहार तुरुंगामध्ये सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीचाही ससेमिरा त्यांच्यामागे लागलेला आहे. 

चिदंबरम ट्विटमध्ये म्हणतात की, अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून आपण खूप चिंतेत आहोत. अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीचा सगळ्यात जास्त फटका गोरगरीब माणसाला बसत आहे. लोकांच्या उत्पन्नात घट झाली असून नोकर्‍यांचे प्रमाण अल्प झाले आहे. व्यापार आणि गुंतवणूकदेखील कमी झाली आहे. मंदीतून सावरून देशाला नवा मार्ग दाखविण्याची योजना कुठेही दिसून येत नाही. 

पी चिदंबरम हे तुरुंगात आहेत. पण, त्यांच्या वतीने त्यांचे कुटुंबातले लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सीबीआयने केलेल्या विनंतीनंतर न्यायालयाने चिदंबरम यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गेल्या सोमवारी देखील चिदंबरम यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिली. आयएनएक्स करारावर अंतिम सही माझी होती, म्हणून मला आरोपी केले जात आहे. कराराच्या प्रक्रियेत जे काही अधिकारी सामील होते, त्यांना अटक केली जाऊ नये, अशी आपली विनंती असल्याचे त्यावेळी चिदंबरम यांनी म्हटले होते.