चीनचे अध्यक्ष जिनपिंग उद्यापासून भारत दौर्‍यावर

Last Updated: Oct 09 2019 5:21PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या भारत दौर्‍याला शुक्रवारपासून सुरुवात होत असून तामिळनाडूतील ममल्‍लापूरम येथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. जिनपिंग आणि मोदी यांच्यातली चर्चा ही अनौपचारिक स्वरुपाची असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. 

चीनमधील वुहान येथे गतवर्षी मोदी आणि जिनपिंग यांच्यादरम्यान पहिली अनौपचारिक चर्चा झाली होती. डोकलाम येथे २०१७ मध्ये भारत आणि चीनचे सैनिक तब्बल ७३ दिवस आमनेसामने ठाकले होते. या पार्श्‍वभूमीवर मोदी आणि जिनपिंग यांच्यादरम्यानच्या वुहान येथील चर्चेला महत्व प्राप्‍त झाले होते. 

जिनपिंग यांच्या भारत भेटीच्या काही तासांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्या देशाचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी बीजिंगमध्ये जाऊन जिनपिंग यांची भेट घेतली होती. काश्मीरच्या मुद्यावर चीनने भारतावर दडपण आणावे, यादृष्टीने इम्रान खान यांनी चीन दौरा केला असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. 

दुसरीकडे काश्मीरचा प्रश्‍न हा भारत आणि पाकिस्तादरम्यानचा प्रश्‍न असून दोन्ही देशांनी सामंजस्याच्या मार्गाने हा प्रश्‍न सोडविण्याची गरज असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्‍त करुन देणारे कलम ३७० संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या आग्रहावरुन चीनने हा मुद्दा संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित केला होता. 

दोन-तीन देश वगळता इतर देशांनी चीन आणि पाकिस्तानच्या मागण्यांना पाठिंबा न दिल्याने त्यावेळी या दोन्ही देशांना हात चोळत बसावे लागले होते. मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीदरम्यान मोदी यांच्याकडून भारताची भूमिका ठोसपणे मांडली जाण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीन यांच्यादरम्यानचे व्यापार युध्द शिगेला पोहोचले आहे. या मुद्यावर जिनपिंग चीनची भूमिका मोदींसमोर मांडण्याची शक्यता आहे. भारत भेटीनंतर जिनपिंग नेपाळच्या दौर्‍यावर रवाना होणार आहेत.