Thu, Jul 02, 2020 23:40होमपेज › None › 'चारधाम' यात्रेचा प्रवास झाला सुकर

'चारधाम' यात्रेचा प्रवास झाला सुकर

Last Updated: May 26 2020 4:47PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दुर्गम भागातील परिवहन व्यवस्थेला ब​ळकटी देण्याचे महत्वाचे कार्य केंद्र सरकारकडून केले जात आहे. याच धर्तीवर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अंत्यत महत्वाकांक्षी 'चारधाम' योजनेतील अत्यंत कठीण अश्या चंबा बोगद्याचे काम पूर्ण केले आहे. मंगळवारी (ता.२६) सकाळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बोगद्याचे उद्धाटन केले. 

लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून (बीआरओ) विक्रमी वेळेत काम पूर्ण करण्यात आले आहे, याचबरोबर ऋषिकेश-धरासू गंगोत्री मार्गावर ८६ कोटींचा निधी खर्चून चंबा गावच्या खालून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-९४ वर हा ४४० मीटर लांब बोगदा तयार करण्यात आला. उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी प्राण गमावले होते. केदारनाथ, गंगोत्री तसेच यमुनोत्री हा बारमाही रस्ता तयार करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला होता. आता हा रस्ता बारा महिने सुरु राहणार असल्याने गडकरींकडून बीआरओच्या सर्व कर्मचार्यांचे, कंत्राटदारांचे कौतुक करण्यात आले.

चंबा बोगद्याप्रमाणेच मानसरोवरला जोडणाऱ्या रस्त्याचे कामही बरेच आव्हानात्मक होते. बीआरओकडून या योजनेवरही उत्तम काम केल जात आहे. राष्ट्रीय महामार्ग-९४ मुळे उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात या अनुषंगाने उत्तराखंड सरकारने प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी गडकरींकडून देण्यात आल्या. 

२५१ किलोमीटर लांब केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री मार्गाचे काम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ​ठरवण्यात आले होते. पंरतु, मुदतीपूर्वीच ऑक्टोबर २०२० पर्यंत मार्ग पूर्ण होईल, असा दावाही गडकरींकडून करण्यात आला. या रस्त्यामुळे चंबा गावात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून चालकांची सुटका होवून त्यांच्या वेळेची बचत होईल, असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

रस्त्याचे काम करताना भुसंपादनासह पाण्याची समस्या, लॉकडाउन अशा अनेक समस्यांचा बीआरओ ला सामना करावा लागला. पूर्वी एका किलोमीटरसाठी चालकांना अर्धा तास लागायचा. आता हे अंतर १० मिनिटांत पूर्ण करता येईल. जानेवारी २०१९ मध्ये बीआरओने बोगद्याचे काम सुरु केले होते. अहोरात्र काम करून ते पूर्ण करण्यात आले आहे. 

अत्याधुनिक ऑस्ट्रीयन तंत्रज्ञानाने या बोगद्याचे काम करण्यात आले आहे. बारा हजार कोटींच्या या प्रकल्पात बीआरओ २५१ किमीचे काम करीत आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत बीआरओ ४ प्रकल्प पूर्ण करणार असल्याचेही गडकरी म्हणाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सौंदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यास बीआरओने सल्लागाराची नियुक्ती करून प्रकल्प तयार करावा. यामुळे या रस्त्यावरील पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असेही गडकरी म्हणाले.