चिदंबरम यांना २६ पर्यंत सीबीआय कोठडी

Published On: Aug 22 2019 3:32PM | Last Updated: Aug 23 2019 1:26AM
Responsive image
पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री ९.४५ वाजता त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात अटक केली.


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दुपारी सीबीआय विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. अजय कुमार यांनी सुनावणीअंती चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. चिदंबरम यांचे कुटुंबीय दररोज त्यांना 30 मिनिटे भेटू शकतील, असे विशेष न्यायालयाने म्हटले आहे.

सुनावणीदरम्यान सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांच्यासाठी 5 दिवसांची सीबीआय कोठडी मागितली होती. मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, की चिदंबरम यांनी चौकशीवेळी कुठल्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही. चिदंबरम यांच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्‍तिवाद केला. या वकीलद्वयीने सांगितले, की चिदंबरम यांनी चौकशीला याआधीही सहकार्यच केलेले आहे. तपासयंत्रणांनी 5 वेळा फोन केला आणि चिदंबरम चौकशीला गेले नाहीत, असे काही झालेले आहे काय? तसे झाले असते तर ते चौकशीला सहकार्य करत नाहीत, असे म्हणता आले असते, असा मुद्दा सिंघवी यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला. सीबीआयकडून केवळ एक फोन आला होता, असे ते म्हणाले. चिदंबरम यांनी न्यायालयाला सांगितले, की मी प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर चौकशीदरम्यान दिले आहे.

चिदंबरम यांना बुधवारी रात्री 10.25 वाजता अटक करण्यात आली होती. रात्रभर ते सीबीआयच्या विश्रामगृहात तळमजल्यावर  सूट नं. 5 मध्ये मुक्‍कामी होते.

सीबीआयचा युक्‍तिवाद असा

तुषार मेहता म्हणाले, गप्प राहणे हा घटनात्मक हक्‍क आहे; पण चिदंबरम यांनी चौकशीत सहकार्य केलेच नाही. प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी केवळ अंग चोरलेले आहे. मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण आहे. त्यांच्याकडे माहिती आहे; पण ते काहीही बोलत नाहीत.

बचाव पक्षाचा युक्‍तिवाद

कपिल सिब्बल म्हणाले, या प्रकरणात आरोपी कार्ती चिदंबरम आहेत. त्यांना 2018 मध्ये दिल्ली हायकोर्टाने नियमित जामीन दिलेला आहे. अन्य आरोपीही जामिनावर आहेत. आरोपपत्राचा मसुदाही तयार झालेला आहे आणि तपास पूर्ण झालेला आहे. गुंतवणुकीला 6 सचिवांकडून मंजुरी दिली जाते. कुणालाही अटक केलेली नाही. हे कागदपत्रांचे प्रकरण आहे आणि चिदंबरम यांनी त्याच्या चौकशीपासून कधीही पळ काढलेला नाही.

ते म्हणाले, की काल रात्री सीबीआय म्हणत होती, की चिदंबरम यांची तातडीने चौकशी करायची आहे आणि आज दुपारी 12 वाजले तरी चौकशी सुरू केलेली नव्हती. सीबीआयने फक्‍त 12 प्रश्‍न विचारले. आता या क्षणापर्यंत सीबीआयला हे माहिती असायला हवे, की कुठले प्रश्‍न विचारायचे आहेत. ज्या प्रश्‍नांशी चिदंबरम यांचे देणे-घेणेच नाही, नेमके ते प्रश्‍न त्यांच्या पुढ्यात ठेवण्यात काय अर्थ आहे? मुळात हे एक असे प्रकरण आहे, ज्याला पुराव्यांशी मतलबच नाही. वेगळाच हेतू या मागे आहे.

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, की सीबीआयची ही संपूर्ण केस इंद्राणी मुखर्जीच्या जबाबावर आणि एका केस डायरीवर आधारलेली आहे. सीबीआयने चिदंबरम यांच्याविरुद्ध पुरावे मिटवल्याचा कुठलाही आरोप केलेला नाही. मग कोठडी का म्हणून मागता आहात? चिदंबरम यांनी स्वत:ही न्यायालयाला सांगितले, की मी प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर दिलेले आहे. 

सीबीआयला खुनाच्या आरोपीवर विश्‍वास

सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवर काँग्रेसचे प्रवक्‍ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे. भाजप सरकारने या यंत्रणांना सुडाचे केंद्रबिंदू बनवून सोडलेले आहे. सीबीआयने आपल्याच लेकीच्या खुनातील आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर विश्‍वास ठेवला; मात्र देशातील एक जबाबदार नेते चिदंबरम यांच्यावर सीबीआयचा विश्‍वास नाही.

उद्घाटन केलेल्या सीबीआय मुख्यालयातच काढावी लागली रात्र

केंद्रीय गृहमंत्रिपदी असताना पी. चिदंबरम यांच्या हस्ते सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. या मुख्यालयातच आरोपी म्हणून रात्र काढण्याची वेळ बुधवारी त्यांच्यावर आली. 30 जून 2011 रोजी सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनावेळी अभ्यागत नोंदवहीत चिदंबरम यांनी लिहिले होते की, 1985 पासून वेगवेगळ्या कारणांद्वारे सीबीआयसोबत जवळून काम केले आहे. या संस्थेची नवीन इमारत पाहून मला अभिमान वाटतो. भारताची प्रमुख तपास यंत्रणा बळकटीने वाढू शकेल आणि आपल्या प्रशासकीय यंत्रणेचा मजबूत आधारस्तंभ होईल अशी आशा आहे. मात्र, आज याच इमारतीमध्ये आयएनएक्स घोटाळाप्रकरणी त्यांची आरोपी म्हणून चौकशी करण्यात येत आहे.

सीबीआयने चिदंबरम यांना विचारलेले प्रश्‍न

तुम्ही आयएनएक्सच्या संचालिका इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचे पती पीटर मुखर्जी यांना कसे ओळखता?  इंद्राणीच्या संपर्कात कुणी पत्रकारही होता का? पैशांच्या व्यवहारात त्याचीही काही भूमिका होती काय?  आयएनएक्स मीडियाने कार्ती चिदंबरमच्या कंपनीला पैसे दिले होते काय? चेस मॅनेजमेंट आणि अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजी या कंपन्यांच्या बाबतीत तुम्हाला काही माहिती आहे काय?  चेस मॅनेजमेंट आणि अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजी या कंपन्या कार्ती चिदंबरम यांच्या मालकीच्या आहेत काय?  दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर तुम्ही कुणाकुणाला भेटलात?  यादरम्यान तुम्ही दुसरा कुठला मोबाईल वापरत होता काय? त्या मोबाईल फोनचा नंबर काय होता?  दोन तासांत तपासयंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर व्हा, अशी नोटीस तुमच्या घरावर लावली होती. तुम्ही हजर का झाला नाहीत?  तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या बेनामी कंपन्या कोणत्या?  कार्ती चिदंबरमला ब्रिटिश व्हर्जिन आयलंडकडून पैसे कशासाठी मिळाले?  स्पेनमध्ये बार्सिलोना टेनिस क्‍लब खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे इतके पैसे कुठून आले?  तुम्ही आणि तुमच्या मुलाने स्पेन आणि मलेशियात संपत्ती खरेदी केली. त्यासाठी पैसे कुठून आले?  परदेशात तुमचे खाते आहे काय?