Mon, Aug 26, 2019 08:40होमपेज › National › शेवटच्या १२ तासांमध्ये बंगालमध्ये आज मोदी ममतांचे धुमशान 

शेवटच्या १२ तासांमध्ये बंगालमध्ये आज मोदी ममतांचे धुमशान 

Published On: May 16 2019 10:55AM | Last Updated: May 16 2019 10:46AM
कोलकाता  : पुढारी ऑनलाईन

लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा जसा जवळ येईल तसे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप आणि तृणमुल काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्‍ठेची केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचाराचे पडसाद दिल्‍लीपर्यंत उमटले.

या दोन्ही पक्षातील मतभेदाचे रूपांतर आता रस्‍त्‍यावरच्या लढाईमध्ये झाल्‍याने निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत, पश्चिम बंगालमधील प्रचाराची मुदत एक दिवसाने कमी केली. यामुळे दोन्ही राजकीय पक्षांना प्रचारासाठी आज कसरत करावी लागणार आहे. दरम्‍यान तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर पश्नचिन्ह उपस्‍थित केले आहे. 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्‍यान भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्‍या हिंसाचारामुळे बंगालची निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या हिंसाचारानंतर भाजपने तृणमुलवर आरोप केले. मात्र तृणमुलने भाजपने बाहेरून गुंड आणून हिंसाचार केल्‍याचा आरोप केला. 

बंगालमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगालमध्ये दोन सभा होणार आहेत. यावर तृणमुल काँगेसच्या ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्‍थित केले आहे, तसेच मोदी यांच्या सभेसाठीच निवडणूक आयोगाने आजपर्यत प्रचाराची मुदत ठेवून मोदी यांच्या सभेनंतर प्रचार थांबविण्याचे घोषित केल्‍याची टीका केली आहे.

काँग्रेसने नवी दिल्‍लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर भाजपचा प्रभाव असल्‍याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने प्रचाराची वेळ २४ तासांनी कमी केल्‍याने आज रात्री १० नंतर प्रचारवेळ संपुष्‍टात येणार आहे. त्‍यामुळे तृणमुल काँग्रेसने आपल्‍या प्रचार वेळेत बदल केला आहे. त्‍यानुसार ममता बॅनर्जी यांच्या आज दिवसभरात बंगालमध्ये तीन सभा होणार आहेत. तसेच दोन पदयात्रांमध्येही त्‍या सहभागी होणार आहेत.