Thu, Sep 21, 2017 23:13
30°C
  Breaking News  

होमपेज › National › राष्‍ट्रपतिपदासाठीचे मतदान पूर्ण, २० ला निकाल

राष्‍ट्रपतिपदासाठीचे मतदान पूर्ण, २० ला निकाल

Published On: Jul 17 2017 6:42PM | Last Updated: Jul 17 2017 7:08PM

बुकमार्क करा


नवी दिल्ली : वृत्तसंस्‍था

भारताच्या १४ व्या राष्‍ट्रपतीपदासाठी मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. संसद भवनशिवाय राज्‍याच्‍या विधानसभांमध्‍ये  मतदान सकाळी १० वाजल्‍यापासून सुरु होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण झाले. आता २० जुलैला राष्‍ट्रपतिपदाचा निकाल जाहीर होणार आहे. 

संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहांमध्‍ये खासदारांना मतदान करण्‍यासाठी व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.  

सध्‍याचे राष्‍ट्रपति प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती २५ जुलै रोजी पदभार स्वीकारतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मतदान केले. भाजपचे ज्येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी, सुषमा स्‍वराज तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी मतदान केले. संसदेच्‍या सभागृहात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही मतदान केले. 

महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विधानसभा सभागृहात मतदान केले. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाम विधानसभेच्या सेंट्रल हॉल येथे मतदान केले. याशिवाय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, राजस्‍थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीसामी यांनी मतदान केले. तसेच केंद्रीय मंत्री व्यंकय्‍या नायडू, स्‍मृती इराणी तसेच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीही मतदान केले. 

कोविंद यांचा विजय निश्‍चित!

राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद हे राष्‍ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. तर काँग्रेस व मित्रपक्षांकडून मीरा कुमार या राष्‍ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीकडे भक्‍कम पाठिंबा आहे. त्यामुळे कोविंद यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. 

राजकीय समीकरणे पाहिली तर या निवडणुकीमध्‍ये रामनाथ कोविंद यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. राष्‍ट्रपति निवडणुकीतील राष्‍ट्रपतिपदासाठीचे उमेदवार असलेले रामनाथ कोविंद आणि मीरा कुमार दोघांनीही देशभरात प्रचार अभियान राबवून आमदारांचे समर्थन मिळवण्‍यासाठी मेहनत घेतली आहे. 

मात्र, बिहारचे माजी राज्‍यपाल कोविंद यांची बाजू भक्‍कम दिसत आहे. कारण त्‍यांना एनडीएशिवाय टीएमसी, सपा आणि आपकडूनही मते मिळाली आहेत. शिवाय जेडीयू आणि बीजू जनता दल यासारख्‍या विरोधी पक्षांचेही समर्थन मिळाले आहे.