होमपेज › National › एकशे अठ्ठावीस कोटी विजेच्या बिलाने त्‍यांची फ्‍युजच उडाली 

एकशे अठ्ठावीस कोटी विजेच्या बिलाने त्‍यांची फ्‍युजच उडाली 

Published On: Jul 21 2019 9:13AM | Last Updated: Jul 21 2019 9:13AM
हापुड : पुढारी ऑनलाईन

एखाद्‍या महिन्यात विजेच्या बिलात १०० ते १५० रूपयांची वाढ झाली तरी आपण या महिन्यात वीजेचा वापर कमी करूया असे स्‍व:ताला बजावतो, मात्र वापरापेक्षा कितीतरी पटीने अधिक म्‍हणजे कोटीच्या घरात बिल ते ही सर्वसामान्य कुटुंबाला आले तर, काय करायचे. याची प्रचिती नुकतीच उत्‍तर प्रदेशातील एका कुटुंबाला आली. या प्रकारामुळे हे कुटुंब चांगलेच हादरून गेले. 

त्‍याचे झाले असे की, उत्‍तर प्रदेशातील हापूड जिल्‍ह्‍यातील चमरी गावात एक सर्वसामान्य कुटुंब राहते. या कुटुंबाला वीज वितरण महामंडळाकडून अचानक 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपयांचे महाबिल देण्यात आले. कुंटुंबाने या बिलाची रक्‍कम पाहिल्‍यावर प्रथम त्‍यांच्या पाया खालची जमिनच सरकली. आपल्‍या नेहमीच्या बिलात २०० ते ३०० रूपयांची वाढ समजू शकतो, पण कोटीच्या घरात आलेल्‍या वीज बिलाने हे कुटुंब चिंताग्रस्‍त झाले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी या घरचा कुटुंबप्रमुख वीज मंडळाच्या कार्यालयात गेला असता, त्‍याला मंडळाच्या अधिकार्‍यांनी तुंम्‍ही जोपर्यंत हे बील भरणार नाही तोपर्यंत तुमच्या घरची लाईट सुरू केली जाणार नाही असे सांगण्यात आले. या प्रकाराने हा कुटुंबप्रमुख चांगलाच चिंतेत पडला. मी इतक्‍या मोठ्‍या रक्‍कमेचे बील कसे भरणार असे त्‍याने म्‍हटले आहे. 

ही काही मोठी गोष्‍ट नाही.....

या बिलाविषयी सहाय्‍यक विद्युत अभियंता राम शरण यांना विचारले असता, त्‍यांनी तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकार झाला आहे. ही काही मोठी गोष्‍ट नाही असे म्‍हणत त्‍यांनी तांत्रिक बाबी नीट झाल्‍यावर आम्‍ही त्‍यांना नवे बिल देणार असल्‍याचे सांगितले आहे.

वीज मंडळाकडून झालेल्‍या चुकीचा नाहक त्रास या सामान्य कुटुंबाला सोसावा लागला. वीज मंडळाच्या अधिकार्‍यांसाठी ही किरकोळ तांत्रिक बाब असली तरी, या बिलातील आकडेवारीने कुटुंबाची मात्र चांगलीच दैना उडाली.