Wed, Aug 21, 2019 19:03होमपेज › National › अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणतात 'मोदी है तो मुमकिन है'

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणतात 'मोदी है तो मुमकिन है'

Published On: Jun 13 2019 11:44AM | Last Updated: Jun 13 2019 10:59AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भाजपाच्या निवडणुकीतील घोषणा 'मोदी है तो मुमकिन है' याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. पोम्पिओ बुधवारी झालेल्या भारत-अमेरिका व्यापार परिषदेच्या बैठकीत म्हणाले, मोदी दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध कशा प्रकारे मजबूत करणार आहेत हे मी पाहणार आहे. एस. जयशंकर हे माझे साथीदार आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.

पॉम्पिओ २४ जून रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. बुधवारी झालेल्या भारत-अमेरिका व्यापार परिषदेच्या बैठकीत 'मोदी है तो मुमकिन है' अशा शब्दात उल्लेख करत मोंदींचे तोंडभरून कौतुक केले. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतील अशी आशा बैठकी दरम्यान पॉम्पिओ यांनी व्यक्त केली.

तसेच ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून काही वाद आहेत. परंतु आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. दोन्ही देशांकडे हिंद-प्रशांत सागर आणि जगाच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन पुढे जाण्याची संधी आहे. असेदेखील त्यांनी मत बैठकीदरम्यान व्यक्त केले. 

पॉम्पिओ यांनी आपले मत भारतदौऱ्यापूर्वी व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताबरोबरच पॉम्पिओ श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचाही दौरा करणार आहेत. संयुक्त राज्य अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोम्पिओ यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींनी संरक्षण क्षेत्रात अमेरिकेला समर्थन दिलं आहे. पण जेव्हापासून ट्रम्प प्रशासनाने भारतावर व्हेनेझुएला आणि इराणकरून तेल खरेदी करण्यासाठी दबाव बनवला, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प प्रशासनानेही भारताला जीएसपी यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.