Tue, Jul 14, 2020 05:24होमपेज › National › बार काऊंसिल अध्यक्षाची कोर्टाच्या आवारात हत्या

बार काऊंसिल अध्यक्षाची कोर्टाच्या आवारात हत्या

Published On: Jun 12 2019 6:34PM | Last Updated: Jun 12 2019 6:34PM
आगरा : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला बार काऊंसिल अध्यक्षांची आगरा येथील सत्र न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. दर्वेश यादव(वय, ३८) असे हत्‍या झालेल्‍या अध्यक्षांचे नाव आहे. तर मनिष शर्मा असे हल्लेखोराचे नाव आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे शर्मा हा दर्वेश यांचा सहकारी वकील आहे.

आगराचे पोलिस उपमहानिरीक्षक अजय आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी मनिष याने दर्वेश यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यात दर्वेश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शर्मा याने स्वत:वरही गोळी झाडली. यात तो गंभीर झाला असून तेथील स्‍थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दर्वेश यादव यांची दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बार काऊंसिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. आगरा कोर्टातील कार्यालयात त्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर ही घटना घडली. मनिष शर्मा याने गोळीबार केल्यानंतर दर्वेश यांचा जागीच मृत्यू झाला.

गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात तणाव वाढला असून वकिलांच्या गटांनी उद्यापासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरवेश यादव निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच कोर्टात आल्या होत्या. कार्यक्रम सुरु असताना मनिष यादव आपल्या जागेवरुन उठला व त्याने गोळीबार सुरु केला, त्यानंतर त्याने लगेच स्वत:वरही गोळया झाडल्या.