Thu, Apr 09, 2020 04:08होमपेज › National › चहा, कॉफी, मद्यही न पिणारे ट्रम्प घेतात तरी काय?

चहा, कॉफी, मद्यही न पिणारे ट्रम्प घेतात तरी काय?

Last Updated: Feb 18 2020 7:14PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जगातील सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सुरू होण्यास आता आठवडाभरापेक्षा कमी काळ राहिला आहे. ट्रम्प यांच्या आगमनाची जय्यत तयारी केंद्र सरकारबरोबरच गुजरात आणि उत्तर प्रदेश सरकार करीत आहेत. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात ट्रम्प गुजरातमधील अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशातील आग्रा शहरांना भेटी देणार आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्याही देशात जातात, त्या देशात त्यांच्यासोबत त्यांची सुरक्षा व्यवस्था जात असते. ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील मोठा ताफा भारतात आला असून सध्या हा ताफा अहमदाबाद येथे आहे. विशेष विमानाने अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसचे एजेंटही भारतात आले आहेत. ट्रम्प यांची सुरक्षा करणारी उपकरणे त्यानी आपल्यासोबत आणली आहेत. अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये ट्रम्प यांचे सुरक्षा पथक थांबले आहे. 

भारतात आगमन झाल्यानंतर ट्रम्प सर्वप्रथम विमानतळावरून अहमदाबादच्या साबरमती आश्रमात जातील. यानंतर जगातील सर्वात मोठया मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. अहमदाबादमध्ये ट्रम्प हे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत २२ किलोमीटरचा प्रवास रस्ते मार्गाने करणार आहेत. मोटेरा स्टेडियमचा प्रत्येक कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत असेल. रोड शो एनएसजी कमांडो आणि अमेरिकन स्नाइपर आजूबाजूच्या इमारतीवर तैनात असतील. संपूर्ण शहरावर हेलीकॉप्टरने लक्ष ठेवले जाणार आहे. काही भागात ड्रोनद्वारे निगराणी केली जाणार आहे.

अहमदाबाद शहरात अकरा हजारपेक्षा जास्त पोलिस तैनात केले जातील तर साबरमती नदीकिनारी विशेष कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. ट्रम्प यांच्या आगमनावेळी अहमदाबाद विमानतळावरील वाहतूक थांबविली जाईल. अहमदाबादहुन जाणाऱ्या काही रेल्वे गाड्यांचा मार्गही बदलण्यात येणार आहे. आपल्या पत्नीसह ट्रम्प सुमारे ४ तास अहमदाबादमध्ये थांबतील. 

अहमदाबादनंतर ट्रम्प आग्रा येथे जातील. ट्रम्प यांच्या या दौऱ्यासाठी आग्रा नगरी सज्ज होत आहे. आग्रा येथील सुरक्षेच्या अनुषंगाने यूएस सीक्रेट सर्विस, विदेश मंत्रालयाचे अधिकारी, राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सुरक्षा यंत्रणांची बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः जातीने मंगळवारी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. 

डाएट कोकचे शौकीन ट्रम्प...

जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौऱ्यात काय खातात, काय पितात, याचीही लोकात उत्सुकता आहे. चहा, कॉफी किंवा मद्याला हात न लावणारे ट्रम्प डाएट कोकचे मोठे शौकीन आहेत. दिवसाला १० ते १२ डाएट कोकच्या बाटल्या ट्रम्प यांना लागतात. मॅकडोनाल्डमधले खाणे आणि मीटलोफ हेही त्यांना पसंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले मित्र ट्रम्प यांना वेगळा कोणता पदार्थ आवडीने खाऊ घालतात, हे पहावे लागेल.