दिल्लीत २५ हजार कोरोना संशयितांवर नजर 

Last Updated: Apr 01 2020 6:20PM
Responsive image
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारने कडक पावले उचलली आहेत. सरकारने कोरोना संशयितांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी एक अनोखी योजना अमलात आणली आहे. कोरोना संशयितांच्या फोनचे लोकेशन शोधून काढले जात आहे. जे कोणी संशयिताच्या संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना ताबडतोब क्वारंटाईनमध्ये पाठविले जात आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे २५ हजार ४२९ संशयितांचे फोन क्रमांक पोलिसांकडे देण्यात आल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

काल ११,०८४ जणांचे फोन क्रमांक पोलिसांकर्ड सुर्पूद करण्यात आले. तर आज १४,३४५ जणांचे मोबाईल क्रमांक पोलिसांकडे दिले जातील. जेणेकरुन हे लोक क्वारंटाईनचे पालन करत आहेत की नाहीत, याची माहिती मिळेल, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, कोरोना संसर्गग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य क्षेत्रातील कुठलाही कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका अथवा सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटींची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी यासंबंधी घोषणा केली. खासगी तसेच सरकारी रूग्णालयात कार्यरत वैद्यकीय कर्मचार्यांचा योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. 

कोरोना संसर्गग्रस्तांची सुश्रूषा करणारे डॉक्टर सैनिकांप्रमाणेच देशाची रक्षा करीत आहे. संसर्गग्रस्ताचा उपचार करताना कुठलाही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचार्याचा मृत्यू झाला; तर त्याला सरकारकडून मदत दिली जाईल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.