Tue, Jun 25, 2019 15:08होमपेज › National › सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही : PM मोदी

सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही : PM मोदी

Published On: Jan 12 2019 2:23PM | Last Updated: Jan 12 2019 3:18PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकते, हे भाजप सरकारने सिद्ध केले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यादांच सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीमधील रामलीला मैदानावर सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना शनिवारी केला.

काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी यांनी म्हटले की याआधीच्या सरकारने देशाला अंधारात लोटले. यामुळे देशाची महत्वाची १० वर्षे (२००४-२०१४) घोटाळे आणि भ्रष्टाचाराने वाया गेली.

आर्थिक दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण दिल्याने 'न्यू इंडिया'चा आत्मविश्वास वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे केवळ मतदार म्हणून पाहिले. मात्र, आमच्या सरकारने त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

सीबीआयबाबत बोलताना मोदी म्हणाले की, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमध्ये तेथील सरकारने सीबीआयवर बंदी का घातली. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा १२ वर्षे यूपीए सरकारने सतावणूक केली. तरीही आम्ही गुजरातमध्ये सीबीआयवर बंदी घातली नाही.

याआधी अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशात कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही. 

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबत खेळ करत आहे. त्यासाठी देशाचा पंतप्रधान आता मजबूत की मजबूर हवा हे आता देशाने ठरवावे.