अरुण साधू - मर्मबंधातील शिक्षक

Published On: Sep 05 2019 4:48PM | Last Updated: Sep 05 2019 4:48PM
Responsive image
अरुण साधू

अभ्युदय रेळेकर


पत्रकार, लेखक, विचारवंत, कादंबरीकार अशी ओळख असलेल्या अरुण साधू यांची आमच्याशी ओळख झाली ती एक शिक्षक म्हणून. अरुण साधू यांचे विद्यार्थी म्हणून आम्ही आजही पत्रकारितेच्या जगतात वावरताना अभिमानाने त्यांचे नाव घेतो. एक पत्रकार, लेखक म्हणून त्यांची जशी खासियत होती तसेच ते खास शिक्षकही होते.

पत्रकारितेच्या लौकिकार्थाने शिक्षण घेण्याला अजूनही मान-सन्मान होता असा तो काळ. साल १९९६ ते १९९८. अर्थात आजही पत्रकारितेच्या शिक्षणाला मान नाही असे नाही. तो आहेच. पण ते दिवस आता राहिले नाहीत असे म्हणण्याची एक पद्धत आहे. आपण तरी त्याला का अपवाद व्हायचे. म्हणून पत्रकारितेच्या लौकिकार्थाने सुरू असलेल्या शिक्षणामध्ये जे तरुण येतात, त्याना तेवढा रस उरला नाही असे म्हणावे लागते. पण याच गोष्टीचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर सोशल मीडियाच्या जंजाळात आता खरी लौकिकार्थाने पत्रकारितेच्या शिक्षणाची गरज आहे असे ठामपणे म्हणावे लागते. असे म्हणण्याचे बळ आम्हाला मिळते त्याच्यापाठीमागे जी कारणे आहेत, त्यामध्ये महत्वाचे कारण म्हणजे साधू सर. 

फक्त पोलिस आणि मिलीटरीचे लोक वायरलेस वापरण्याच्या जमान्याला छेद देत त्या काळात सुरुवातीला पेजर आणि लगेच मोबाईल आल्याने माध्यम जगतात एक वेगळेच नवे दालन सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आपण सगळेजण होतो. मोबाईल युग नुकतेच सुरू होत होते. माध्यमांनी वेग घेण्याचे ते दिवस होते. त्या काळात नवपत्रकारितेची ओळख अरुण साधू यांनी आम्हाला करुन दिली. पुणे विद्यापाठात आधुनिक पत्रकारितेच्या प्रात्यक्षिकासह शिक्षणाला त्यावेळी सुरूवात करुन दिली ती साधू सरांनी.

पेन-कागद, ब्लॉक, लेटरप्रेस याकडून पत्रकारिता ऑफसेट प्रिंटिंगकडे सरकून अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन चांगलीच स्थिरावली होती. या काळात पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक यंत्रणा शिक्षणासाठी उभी राहिली पाहिजे. काळाच्या बरोबर राहून त्यापद्धतीचे शिक्षण, प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे ही भूमिक साधू सरांची पहिल्यापासून होती. त्यामुळेच त्यांनी पत्रकारिता विभागात संगणक कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. तत्कालिन समाजधुरिण बी. जी. शिर्के यांच्या आर्थिक सहकार्याने साधू सरांनी सर्व सोयीनीयुक्त असा संगणक कक्ष उभारला. त्या संगणक कक्षात सर्वप्रथम पत्रकारितेचे तांत्रिक धडे घेण्याचे भाग्य आम्हाला केवळ साधु सरांच्यामुळेच लाभले. पत्रकारितेचे विद्यार्थी विभागात कमी आणि इतर ठिकाणीच जास्ती असा अनुभव सर्वसाधारणपणे असतो. मात्र साधु सरांच्यामुळे आम्ही जास्तीत जास्तवेळ आमच्या विभागात राहत असू. हिरीरीने सगळ्याच प्रयोगांच्यामध्ये सहभागी होऊन पत्रकारितेचे लौकिकार्थाचे शिक्षण वास्तवात आम्ही व्यावसायिक-प्रोफेशनल प्रात्यक्षिकासह घेऊ शकलो, ते साधु सरांच्यामुळेच.

पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी सलग ७ दिवस दैनिक काढणे हा कदाचित जगातला सर्वात पहिला प्रयोग साधू सरांनी राबवला. वृत्त संकलनापासून वृत्तपत्र घरोघरी पोहोचवणाऱ्यापर्यंत सर्वच जबाबदाऱ्या सर्वांना समजून घेऊन पार पाडता येतील असे या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन केले होते. आम्ही सर्वच उमेदीच्या पत्रकारांनी त्यामध्ये मनापासून सहभाग घेतला. बातम्या, फोटो घेऊन येणे. त्या टाईप करणे. लेख, अग्रलेख लिहिणे. संगणकांवर पाने लावणे. त्यांचा व्यवस्थित लेआऊट करुन घेणे. बटर पेपरवर त्याची प्रिंट काढून घेणे. त्याचे प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन पेस्टींग करुन घेणे. तसेच प्लेटमेकिंग कसे चालते ते पाहणे. प्लेट घेऊन पेपर रात्रीच प्रिंट करुन घेणे. या पेपरच्या कॉपीज सकाळी विद्यापीठात सर्वत्र वाटणे, ही सगळी कामे सरांनी आमच्याकडून त्यावेळी सराईतपणे करुन घेतली. आयुष्यभर लक्षात राहील असा पत्रकारितेच्या प्रत्यक्ष शिक्षणाचा अत्यंत अत्याधुनिक असा अनुभव आम्ही त्यावेळी घेतला. एक शिक्षक, विद्यार्थी कशा पद्धतीने घडवू शकतो, त्याचा तो प्रत्यक्ष अनुभव होता. असा अनुभव देणाऱ्या शिक्षकाला या शिक्षक दिनानिमित्त आदरांजली..!