Thu, Jan 17, 2019 08:20होमपेज › National › Live कर्नाटक : येडियुरप्‍पा मुख्यमंत्री; राजकीय हालचालींना वेग

Live कर्नाटक : येडियुरप्‍पा मुख्यमंत्री; राजकीय हालचालींना वेग

Published On: May 17 2018 8:55AM | Last Updated: May 17 2018 4:39PMबंगळूर : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्‍हणून भाजप नेते बीएस येडियुरप्‍पा यांनी आज तिसर्‍यांदा शपथ घेतली. मोठ्या राजकीय नाट्यानंतर बंगळूरमधील राजभवन येथे राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कर्नाटकचे ते २५ वे मुख्यमंत्री असतील. आज (दि. १७) रोजी सकाळी ९ वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्‍थित नव्‍हते. तर काँग्रेसने लोकशाहीची हत्या म्‍हणत बंगळूरमध्ये विधानसौधसमोर आंदोलन सुरू केले आहे. 

वाचा : येडियुरप्पांना बहुमत मिळवण्यासाठी हे पर्याय

राज्यपाल वजुभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष म्‍हणून भाजपला सरकार स्‍थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेस, निजद युतीने सर्वोच्‍च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली होती. न्यायालयाने मध्यरात्रीपर्यंत कामकाज सुरू ठेऊन शपथग्रहण समारोह थांबवता येणार नसल्याचा निकाल दिल्याने येडियुरप्‍पा यांचा मुख्यमंत्री म्‍हणून शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. परंतु, त्यांना आता १५ दिवसांच्या आत बहुमत सिद्ध करावे लागेल. तसेच न्यायालयाने आज १०.३० वाजेपर्यंत दोन्‍ही पक्षांना आमदारांची यादी देण्याचे निर्देश दिले आहेत.

वाचा : कारकून ते मुख्यमंत्री येडियुरप्पांचा प्रवास

दरम्यान, काँग्रेसने या शपथविधीला विरोध दर्शविला आहे. कर्नाटक विधानसभेसमोरील महात्‍मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने सुरू केली आहेत. काँग्रेस नेते अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, मल्‍लीकार्जुन खरगे तसेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्‍या आंदोलकांमध्ये आहेत. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी येडियुरप्‍पांच्या शपथविधीला लोकशाहीची हत्या म्‍हटले आहे.

अपडेट : 

कर्नाटकमध्ये झालेल्‍या लोकशाही हत्येच्या विरोधात आपण उद्या एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार :  तेजसी यादव, राजद

आपण सर्वांनी पाहिलं की तामिळनाडूत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यपालांचा चुकीचा वापर केला. तसेच कर्नाटकातही केले. हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे : एमके स्‍टॅलिन, द्रमुक

 

राज्यपाल संविधानाच्या विरोधात जात आहेत. त्यांची भूमिका सरकारकडून ठरविण्यात येत आहे. ते आरएसएसचे सदस्य होते आणि मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. त्यामुळे साहजिकच ते केंद्र सरकारचे ऐकणार : कॅप्‍टर अमरिंदर सिंग

 

हे सरकार थोड्या काळासाठी आहे. आम्‍हाला पूर्ण विश्वास आहे की बहुमत आमच्याबरोबर आहे. आम्‍ही न्यायासाठी लढणार आमचे सगळेच्या सगळे १०० टक्‍के आमदार आमच्याबरोबर आहेत : डीके शिवकुमार, काँग्रेस

 

बाबासाहेबांनी तयार केलेले संविधान बर्बाद करण्याचा डाव आहे. सत्तेत आल्यापासून हे ताकतीचा चुकीचा वापर करत आहेत : बसपप्रमुख मायावती

 

आज संविधानावर हल्‍ला होत आहे. कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार आहेत तर दुसरीकडे राज्यपाल. निजदने सांगितले आहे की त्यांच्या आमदारांना १०० कोटींची ऑफर दिली आहे : राहुल गांधी

 

ज्येष्‍ठ वकील राम जेठमलानी यांनी कर्नाटकमध्ये सरकार स्‍थापन करण्यासाठी येडियुरप्‍पांना पाचारण केल्या प्रकरणी तात्‍काळ सुनावणीची मागणी केली.

अपक्ष आमदार आमच्या संपर्कात, काम होणार : भाजप आमदार बी. श्रीरामुलु

 

बंगळूर : काँग्रेस आणि निजदचे सर्व ११८ आमदार आंदोलनस्‍थळी उपस्‍थित : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्‍या

 

मुख्यमंत्रिपदावर येताच येडियुरप्‍पांनी काम सुरू केले. शेतकर्‍यांना एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर

बंगळूर : निजद नेते एचडी देवेगौडा काँग्रेसच्या विधानसौध परिसरातील आंदोलनात सहभागी

 

येडियुरप्‍पांचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंड्या जिल्‍ह्यातील मूळ गाव बुकनकेर येथे आनंदोत्‍सव

 

येडियुरप्‍पा यांनी शपथ घेतली आहे. परंतु, त्यांना बहुमत सिद्ध करणे कठिण आहे. राज्यपालांनी ज्यांच्याजवळ बहुमत आहे त्यांनाच सरकार स्‍थापनेसाठी बोलावण्याची गरज होती. अन्यथा लोक म्‍हणणारच की, लोकशाहीची हत्या झाली. परंतु, जर देशात लोकशाहीच शिल्‍लक राहिली नसेल तर हत्या कोणाची होणार? : शिवसेना नेते संजय राऊत

बीएस येडियुरप्‍पा तिसर्‍यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले आहेत. मला विश्वास आहे की ते एक स्‍थिर आणि जबाबदार सरकार बनवतील. एवढा जुना पक्ष असूनही काँग्रेस चुकीचे पाऊल टाकत आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांनी एका जबाबदार विरोधी पक्षाप्रमाणे काम करावे : अनंत कुमार, भाजप

 

बंगळूर : आनंद सिंह सोडून सर्व आमदार याठिकाणी आहेत. ते नरेंद्र मोदींच्या भूलथापांना फसले आहेत : डीके सुरेश, काँग्रेस

 

भाजप आणि त्यांचे मंत्री आमच्या आमदारांना खरेदी करण्याच्या प्रयत्‍नात आहेत. आम्‍हाला भाजपपासून आमचे आमदार सुरक्षित ठेवायचे आहेत. लोकांना केंद्र सरकारच्या धोरणांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. भाजपजवळ पूर्ण बहुमत नव्‍हते. तरीही राज्यपालांनी हे कसे काय केले? आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर केला : एचडी कुमारस्‍वामी

 

राहुल गांधींच्या ट्‍विटला भाजप अध्यक्ष अमित शहांचे प्रत्युत्तर; "लोकशाहीची हत्या तेव्‍हा होते जेव्‍हा काँग्रेसने स्‍वार्थासाठी निजदसमोर ऑफर ठेवली. तीही कर्नाटकच्या भल्यासाठी नाहीतर स्‍वत:च्या राजकीय फायद्यासाठी."

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्‍विट, बहुमत नसतानाही भाजपचे सरकार स्‍थापन करणे म्‍हणजे संविधानाचा अपमान आहे. आज सकाळी जेव्‍हा भाजप आपल्या पोकळ विजयाचा आनंदोत्‍सव करत असेल तेव्‍हा भारत लोकशाहीच्या पराभवावर शोक करेल.

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्‍पा विधानसौध येथे पोहोचले

 

काँग्रेसचे सर्व आमदार संपर्कात आहेत, सध्या फक्‍त दोघेजण या ठिकाणी उपस्‍थित नाहीत. मी आताच मंगलूरहून परत आलोय : काँग्रेस आमदार खादेर

येडियुरप्‍पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदारांची विदानसौधपुढे निदर्शने

बंगळूर : एचडी देवेगौडा घरातून निजद आमदार ठेवलेल्या हॉटेलकडे रवाना

विधानसभा परिसरात काँग्रेस नेत्यांकडून आंदोलन

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्‍पा भाजप नेते अनंत कुमार आणि मुरलीधर राव यांच्यासोबत

काँग्रेसचे आमदार आणि गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, केसी वेणुगोपाल आणि सिद्धरामय्‍या विधानसभा परिसरातील महात्‍मा गांधीच्या पुतळ्याजवळ विरोध प्रदर्शन करताना

येडियुरप्‍पा तिसर्‍यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी

 

येडियुरप्‍पांनी राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडून घेतली पद आणि गोपनियतेची शपथ

 

येडियुरप्‍पांचे शपथविधी सोहळ्यासाठी राजभवन येथे आगमन

 

राजभवन येथील तयारी

 

थोड्याच वेळात येडियुरप्‍पा राजभवन येथे शपथविधीसाठी येणार, केंद्रीय मंत्री जेपी नड्‍डा, धर्मेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर राहणार उपस्‍थित

बंगळूरमधील भाजप कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढविली.

 

विशेष म्‍हणजे अर्ध्या रात्री पर्यंत सर्वोच्‍च न्यायालय दुसर्‍यांदा सुरू होते. यापूर्वी याकूब मेमनच्या फाशी प्रकरणी झालेली सुनावणीसाठी सर्वोच्‍च न्यायालय अर्ध्या रात्रीपर्यंत सुरू होते.

सर्वोच्‍च न्यायालयाने आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत दोन्‍ही पक्षांना आपआपल्या आमदारांची यादी देण्याचा आदेश दिला. 

बंगळूरमधील येडियुरप्‍पा यांच्या घराबाहेरचे चित्र; आज सकाळी ९ वाजता शपथविधी

 

न्यायालयाने काँग्रेस आणि निजदची याचिका रद्दबातल ठरवली नाही. या याचिकेवर पुन्‍हा सुनावणी होऊ शकते, असे न्यायालयाने सांगितले. तसेच येडियुरप्‍पांना उत्तर देण्याचे नोटीसही दिले.

संघवी यांच्या शपथविधी ४.३० वाजेपर्यंत टाळावा, अशी मागणीही न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाने येडियुरप्‍पांचा शपनविधी थांबविता येणार नसल्याचा निर्णय दिला. मात्र, १५ दिवसांत बहुमद सिद्ध करावे लागणार असल्याचे निर्देश दिले.

याप्रकरणी केंद्र सरकारच्या वतीने ॲडिशनल सॉलिसिटरी जनरल तुषार मेहता, भाजपच्या वतीने माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी आणि काँग्रेसकडून अभिषेक मनु संघवी यांनी युक्‍तीवाद केला

राज्यपाल वजुभाई वाला यांच्या येडियुरप्‍पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि निजदची सर्वोच्‍च न्यायालयात धाव. सर्वोच्‍च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने याप्रकरणी रात्री १.४५ वा. सुनावणी सुरू केली. 

Tags :karnataka, karnataka election, yeddyurappa, BJP, government, congress, JDS, kumarswammy