होमपेज › National › मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही : सुप्रीम कोर्ट

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही

Published On: Jul 12 2019 11:40AM | Last Updated: Jul 12 2019 12:00PM




नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षण प्रकरणी मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तसेच या प्रकरणी महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवून कोर्टाने उत्तर मागितले आहे. यावर आता दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देता येत नसल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडथळा तुर्तास तरी दूर झाला आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मराठा आरक्षणाविरोधात डॉ. जयश्री पाटील यांच्या वतीने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात सरसकट १६ टक्के आरक्षण दिले होते. या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर उच्च न्यायालयाने २७ जूनला निकाल देताना मराठा आरक्षणाला मान्यता देताना, राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात आरक्षण देण्यात आल्याचे नमूद करून आरक्षणात कपात करण्याचे आदेश दिले होते. शिक्षणात १२ टक्के, तर नोकर्‍यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्यास न्यायालयाने मान्यता दिली. त्यानुसार राज्य सरकारने १ जुलै रोजी सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडले. या विधेयकाला एकमताने मान्यता देण्यात आली होती.