Sat, Feb 23, 2019 18:19होमपेज › National › चंद्राबाबूंच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा?

चंद्राबाबूंच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा?

Published On: Feb 11 2019 6:22PM | Last Updated: Feb 11 2019 7:30PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आंध्रला विशेष राज्याच्या दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र भवनमध्ये उपोषण केले. विशेष म्हणजे केंद्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आज, सोमवारी (दि.११) चंद्राबाबू यांची उपोषणस्थळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

सजय राऊत यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे देखील चंद्राबाबूंना भेटले. दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे.   

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा. तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी नायडू यांनी केली आहे.

आंध्रचे विभाजन झाल्याने तसेच विभाजनावेळी आंध्रावर अन्याय झाल्याने चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधक एकत्र येत असून त्यांची महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे.