Sun, Aug 25, 2019 02:24होमपेज › National › रोहित शेखर तिवारीच्या पत्नीची पोलिसांकडून चौकशी

रोहित शेखर तिवारीच्या पत्नीची पोलिसांकडून चौकशी

Published On: Apr 20 2019 8:04PM | Last Updated: Apr 20 2019 8:04PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा 

उत्‍तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. डी. तिवारी यांचे पूत्र रोहितच्या मृत्यूप्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी शनिवारी रोहितच्या पत्नीची चौकशी केली. रोहित यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर गळा दाबल्यामुळे त्यांचा जीव गेल्याचा अंदाज शवविच्छेदन अहवालात व्यक्‍त करण्यात आला होता. 

गेल्या 16 तारखेला रोहितचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्‍त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले होते. गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आज रोहितची पत्नी अपूर्वा हिची चौकशी केली. रोहितच्या डिफेन्स कॉलनीतील निवासस्थानी ही चौकशी झाली. रोहित आणि अपूर्वा यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र लग्‍नाच्या पहिल्या दिवसांपासून या दोघांमध्ये तणाव होता, अशी माहिती रोहितची आई उज्जवला यांनी पोलिसांना दिली.

शवविच्छेदन अहवाल प्राप्‍त झाल्यानंतर पोलिसांनी 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. एन. डी. तिवारी हेच आपले पिता असल्याचा दावा करीत रोहित यांनी प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढाई लढली होती. त्यानंतर एन. डी. तिवारी यांनी रोहित आपला मुलगा असल्याचे मान्य केले होते.