Tue, Nov 19, 2019 11:41होमपेज › National › पीएम मोदींना सलग ९ क्लिन चिट दिल्यानंतर EC कडून आता 'ती' माहिती उघड करण्यास नकार! 

पीएम मोदींना सलग ९ क्लिन चिट दिल्यानंतर EC कडून आता 'ती' माहिती उघड करण्यास नकार! 

Published On: Jun 24 2019 7:00PM | Last Updated: Jun 24 2019 7:00PM
पुणेस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी आरटीआय कायद्यान्वये लवासा यांनी पीएम मोदींना क्लिन चिट देताना दर्शवलेली असहमती उघड करण्यात यावी अशी मागणी केली होती. आयोगाने त्यांची मागणी फेटाळून माहिती उघड करण्यास नकार दिला. माहिती उघड केल्यास कदाचित अत्यंत जोखमीचे आणि शारिरीक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण दिले आहे. 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सलग क्लिन चिट देण्यावरून बरीच चर्चा झाली. विरोधी पक्षांनी टीकेचे आसूड ओढले. पीएम मोदींना सलग क्लिन चिट देण्यावरून निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी जाहीर नाराजी व्यक्त करताना आयोगाच्या बैठकीमध्ये असहमती व्यक्त केली होती. 

या प्रकरणी पुणेस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी आरटीआय कायद्यान्वये लवासा यांनी पीएम मोदींना क्लिन चिट देताना दर्शवलेली असहमती उघड करण्यात यावी अशी मागणी केली होती. आयोगाने त्यांची मागणी फेटाळून माहिती उघड करण्यास नकार दिला. माहिती उघड केल्यास कदाचित अत्यंत जोखमीचे आणि शारिरीक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण दिले आहे. 

निवडणूक आयोगाने  माहिती देण्यास नकार देताना आरटीआय कायद्यातील कलम ८ (१) (जी) चा आधार घेतला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना आचरसंहितेचे उल्‍लंघन केल्‍याच्या आरोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने तब्‍बल ९ वेळा क्‍लीन चिट दिली. मोदींविरोधातील ८ व्या आणि ९ व्या तक्रारीतही त्‍यांना क्‍लीन चीट मिळाली. २३ एप्रिल रोजी अहमदाबादमधील रॅली आणि कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये प्रचारादरम्‍यान भाषण करताना मोदींनी आचारसंहितेचे उल्‍लंघन केल्‍याचा विरोधकांनी त्‍यांच्यावर आरोप केला होता. 

नरेंद्र मोदी यांनी २३ एप्रिल रोजी गुरजारमध्ये आपला मतदानाचा हक्‍क बजावला. परंतु, मतदानासाठी ते खुल्‍या जीपमधून गेले होते. त्‍यामुळे विरोधी पक्षांनी मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचे उल्‍लंघन केल्‍याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी मोदींना निवडणूक आयोगाने क्‍लिन चिट दिली. 

याबरोबरच कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये एका प्रचारादम्‍यान केलेल्‍या भाषणावरही मोदींना क्‍लीन चीट मिळाली. या भाषणांमध्ये मोदींनी पहिल्‍यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले पहिले मत बालाकोटमध्ये करण्यात आलेल्‍या हवाई हल्‍ल्‍यातील जवानांना समर्पित करण्याचे आवाहन केले होते. 

नरेंद्र मोदींच्या या आवाहनावर आक्षेत घेत मोदी सैनिकांच्या नावाने मत मागत असल्‍याची तक्रार विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या या तक्रारीवर निवडणूक आयोगाने मोदींना क्‍लीन चिट दिली आहे. या आधी आचारसंहितेचे उल्‍लंघन केल्‍याच्या सात तक्रारींमध्ये मोदींना क्‍लिन चिट मिळाली.