Tue, Oct 24, 2017 16:54
29°C
  Breaking News  

होमपेज › National › राष्ट्रपतिपदासाठी उत्साहात मतदान

राष्ट्रपतिपदासाठी उत्साहात मतदान

Published On: Jul 18 2017 2:38AM | Last Updated: Jul 18 2017 2:37AM

बुकमार्क करा


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह राज्यांच्या राजधान्यांमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान झाले. संसद भवनात सर्वप्रथम मतदान करणार्‍यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा समावेश होता. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने दिल्ली व सर्व राज्यांसाठी 33 निरीक्षकांची नियुक्ती केली होती. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद विरुद्ध काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात राष्ट्रपतिपदासाठी खरा मुकाबला होत आहे. निवडणुकीचा निकाल 20 तारखेला सायंकाळी जाहीर केला जाणार असून कोविंद यांचा विजय नक्की मानला जात आहे. 

संसद भवनातील दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत राष्ट्रपतिपदासाठी मतदान पार पडले. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांसह दिल्ली विधानसभेच्या आमदारांनी संसदेत मतदान केले. तर राज्यांमध्ये आमदारांसह कित्येक खासदारांनीही मतदान केले. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै संपत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अद्यापपर्यंत खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी क्रमशः लखनौ आणि पणजी येथे मतदान केले. संसदेतील खोली क्रमांक 62 मध्ये सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली. मोदी आणि शहा यांनी मतदान केल्यानंतर मतदानासाठी खासदारांची रीघ लागली. मतदानासाठी मतदारांना वैयक्तिक पेन आणण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली होती. आयोगाकडून विशिष्ट प्रकारचे पेन उपलब्ध करण्यात आले होते.