Sun, Jun 16, 2019 08:37होमपेज › National › थर्ड पार्टी इन्श्युरन्स महागण्याची शक्यता

थर्ड पार्टी इन्श्युरन्स महागण्याची शक्यता

Published On: May 22 2019 1:41AM | Last Updated: May 22 2019 1:41AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

आयआरडीए (इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी) ने चालूवर्षी दुचाकी, कार आणि ट्रकसाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे आता वाहन चालवणे महागात पडणार आहे. कारण, दुचाकी आणि कारसह ट्रक, बसलाही या वाढलेल्या हप्त्याची झळ बसणार आहे. 

विम्याचा हप्ता वाढल्यास 1,000 सीसीहून कमी क्षमता असलेल्या कार्सचा थर्ड पार्टी प्रीमियम 1,850 वरून 2,120 रुपये होईल. तर 1,000 सीसी ते 1,500 सीसी दरम्यानच्या कारचा प्रीमियम सध्याच्या 2,863 रुपयांवरून वाढून 3,300 रुपये इतका होईल. तथापि, 1,500 सीसीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या लक्झरी कार्ससाठीच्या विम्यामध्ये कोणत्याही बदलाचा प्रस्ताव नाही. सध्या या कार्सचा प्रीमियम 7,890 रुपये असून, तो तितकाच राहील. 

दुचाकींचा विचार करता 75 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींचा थर्ड पार्टी प्रीमियम 427 रुपयांवरून 482 रुपये वाढविण्याचा प्रस्ताव आहे. तर 75 सीसी ते 350 सीसीपर्यंतची क्षमता असलेल्या दुचाकींचा थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. 350 सीसीहून जास्त क्षमता असलेल्या दुचाकींमध्ये मात्र प्रीमियम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. विशेष म्हणजे, आयआरडीएने इलेक्ट्रिक वाहनांसाठी थर्ड पार्टी प्रीमियममध्ये 15 टक्के डिस्काऊंट देण्याचाही प्रस्ताव आहे. म्हणजे ई-रिक्षासाठी हा प्रीमियम वाढणार नाही. मात्र, स्कूलबसचा प्रीमियम वाढू शकतो. तसेच टॅक्सी, बस आणि ट्रकच्या प्रीमियममध्येही वाढीचा प्रस्ताव आहे.