तबलिगी जमातीत गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांवर दगडफेक; ३ जणांना अटक 

Last Updated: Apr 01 2020 6:31PM
Responsive image


मधुबनी ( बिहार ) : पुढारी ऑनलाईन 

दिल्लीतील तबलिगी तमातीत गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी मंगळवारी पोलिस बिहारच्या मधुबनी भागात गेले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी आज ( दि.1)  तीन लोकांना अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

जांजरपूरचे डीएसपी अमित शरण यांनी 'दिल्लीतील तबलिगी जमातला गेलेले काही लोक गिरदारजंग गावातील मशिदीत असल्याचे कळाल्यावर पोलिस याची तपासणी करण्यासाठी काल (मंगळवारी) गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी तीन लोकांना अटक करण्यात आली आहे.' अशी माहिती दिली. यापूर्वी आज डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारचे आणि विदेशातील लोक जे दिल्लीतील मरकजला उपस्थित होते त्यापैकी बऱ्याच जणांचा ट्रेस लागला असून त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे असे सांगितले होते. 

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील मरकज इमारतीत तबलिगी जमातीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यावेळी या इमारतीतील जमातीत सहभाग घेतलेल्या 24 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर या इमारतीतून संपूर्ण देशात गेलेल्या लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरु करण्यात आला.