देशव्यापी लॉकडाऊन उठविला जाण्याची शक्यता कमी 

Last Updated: Apr 10 2020 3:04PM
Responsive image
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन उठवायचा की नाही, याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या शनिवारच्या बैठकीदरम्यान होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत येत्या मंगळवारी संपणार आहे.

वाचा : राज्यात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले!

कोरोना विषाणूच्या संक्रमणाने जगभरात धुमाकूळ घातला असून भारतातील संक्रमित लोकांची संख्या साडेसहा हजारांवर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन एकाचवेळी उठविला जाण्याची शक्यता कमी आहे. कोरोनाचा वाढता फैलाव आणि त्या-त्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच लॉकडाऊनच्या संदर्भात पंतप्रधान शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. 

वाचा : कोरोनाबाधित क्षेत्रातील ५ कारागृहे लॉकडाऊन; गृह मंत्रालयाचा निर्णय!

कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जावा, अशी मागणी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मागील काही दिवसांत केंद्र सरकारकडे केली आहे. १४ एप्रिलनंतर एकाचवेळी देशव्यापी लॉकडाऊन उठविणे शक्य होणार नसल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीवेळी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे अनेक राज्य, जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. देशव्यापी लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय होण्यापूर्वीच ओडिशा सरकारने आपल्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविला आहे.