Fri, Dec 13, 2019 19:25होमपेज › National › देशात लोकशाही; आणीबाणी नव्हे

देशात लोकशाही; आणीबाणी नव्हे

Published On: Jun 25 2019 7:58PM | Last Updated: Jun 25 2019 7:58PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आम्ही कुणालाही तुरुंगात का टाकत नाही, असे आरोप आमच्यावर केले जातात. अरे... इथे आम्ही काही आणीबाणी नावाची व्यवस्था लावलेली नाही की, कुणालाही उचलावे आणि तुुरुंगात टाकावे. लोकशाही आहे. तुरुंगात कुणाला टाकावे, याचा निर्णय घेण्यासाठी न्यायपालिका आहे आणि ती समर्थ आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत केले. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मोदींनी चौफेर फटकेबाजी केली. विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही मोकळेपणाने कायद्याचे काम कायद्यालाच करू देतो. कुणाला जर जामीन मिळत असेल, तर त्याने खुशाल मिळवावा, मजेत खुल्या हवेत राहावे. आमचा सुडाच्या राजकारणावर विश्‍वास नाही; पण भ्रष्टाचाराविरोधात आमचा लढा सुरूच राहील. आम्हाला या देशाने इतके भरभरून दिलेले आहे की, चुकीची वाट चोखाळण्याची आम्हाला गरजच नाही.  

संसदेतील चर्चेत काँग्रेसचे खा. अधीर रंजन चौधरी हे मोदींना उद्देशून म्हणाले होते की, तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चोर म्हणूनच सत्तेत आलेले आहात. जर गांधी माता-पुत्र चोर आहेत, तर मग त्यांचे स्थान संसदेत कसे? त्यावर मोदींचे हे उत्तर होते. शिवाय, ‘नॅशनल हेरॉल्ड प्रकरणा’त सोनिया गांधी व राहुल गांधी यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याचा संदर्भही पंतप्रधानांच्या भाषणाला होता. 

मोदी म्हणाले, आमची उंची कुणी मोजू शकत नाही. कारण, आम्ही कुणाचीही रेषा पुसून छोटी करण्यावर विश्‍वास ठेवत नाही. आमचीच रेषा मोठी करत नेण्यावर आमचा विश्‍वास आहे. त्यासाठी आम्ही जीवन समर्पित केलेले आहे आणि करत राहू. तुमची उंची तुम्हालाच लखलाभ! तुम्ही इतके उंच झालेले आहात की, तुम्हाला आता जमीनही दिसत नाही. मुळांपासून उखडून गेला आहात तुम्ही. म्हणून जे जमिनीवर असतात, ते सगळे तुम्हाला तुच्छ दिसतात. तुमचे असे उंच असणे ही आमच्यासाठी आनंदाचीच बाब आहे. माझी इच्छा आहे की, आपण असेच आणखी उंच व्हा. उंचीवरून आपल्याशी माझा वादच नाही. कारण, तळागाळाशी जुळलेले राहून देशाला शक्तिशाली करण्याचा मार्ग मी निवडलेला आहे.

 पंतप्रधान म्हणाले, लोकांना माहिती आहे की, 25 जून काय आहे? या तारखेला एका रात्रीत देशाचा आत्माच संपवून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. महापुरुषांना तुरुंगात डांबले होते. माध्यमांची गळचेपी केली होती. देशाचा तुरुंग करून टाकलेला होता. केवळ यासाठी की, कुणाची तरी सत्ता कायम राहावी. लोकशाही या देशाच्या राज्यघटनेच्या पानापानांतच आहे, असे नाही. ती हजारो वर्षांपासून इथल्या मनामनांत आहे. 25 जूनला आम्ही लोकशाहीचा संकल्प दृढ करत आहोत. त्यावेळी या पापाचे जे जे कुणी भागीदार होते, त्यांनी हे लक्षात घ्यावे  की, आणीबाणीचा डाग पुसणे केवळ अशक्य आहे. हा डाग नेहमी स्मरणात ठेवणे यासाठीही गरजेचे आहे की, आणखी कुणी असा जन्माला येऊ नये जो पुन्हा हे पातक करायला धजेल.

क्षणिक लाभाच्या मर्यादेत मी कधी अडकत नाही : मोदी

मोदी म्हणाले, क्षणिक लाभाच्या मर्यादेत मी कधीही अडकत नाही. संकुचित विचार करणे मला पसंद नाही. देशवासीयांचे स्वप्न जगायचे असेल, तर संकुचित विचार करण्याचा हक्कच मला नाही. नव्या सरकारला तीनच आठवडे उलटले आहेत. हार-तुरे स्वीकारण्याचा हा काळ असतो; पण आम्ही या लहानशा काळातही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सैनिकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ केली. मानवाधिकाराशी संबंधित महत्त्वपूर्ण कायदे संसदेत आणण्यासाठीची पूर्वतयारी केली. 

एका मोठ्या कालखंडानंतर देशाने एक मजबूत जनादेश दिलेला आहे. एक सरकार दुसर्‍यांदा निवडून दिले आहे. पहिल्यापेक्षा अधिक ताकद देऊन निवडून दिले आहे. आपला मतदार आता इतका जागरूक झालाय की, स्वत:हून जास्त प्रेम त्याचे देशावर आहे. स्वहितापेक्षा देशहिताचा तो अधिक विचार करतो, हे निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. आमच्या आधीच्या सरकारने नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न जाहीर केले नाही. एका कुटुंबाबाहेर कुणालाही नाही. आम्ही प्रणव मुखर्जींना हा सन्मान दिला. प्रणवदांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले, ही त्यामागची भावना होती. जेव्हा आम्ही देशाची गोष्ट करतो, तेव्हा त्यात सर्व लोकसंख्या समाविष्ट असते, असा टोला त्यांनी लगावला.