#AYODHYAVERDICT; शांतता राखा, हा निकाल कोणाच्याही जय-पराजयाचा नाही : पंतप्रधान मोदी

Last Updated: Nov 09 2019 8:53AM
Responsive image
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली/मुंबई : पुढारी ऑनलाईन

अयोध्या खटल्याचा निकाल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ आज शनिवारी सकाळी १०.३० वाजता जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

अयोध्येचा जो निकाल येईल तो कोणाच्याही जय-पराजयाचा नसेल. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. ''शांती, आणि एकता कायम राखणे ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. आता हा निर्णय या परंपरेला आणखी बळ देईल.” अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.

अयोध्या खटल्याच्या सुनावणीच्या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केले. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. आता अयोध्या खटल्याच्या निर्णयानंतरही शांतता कायम राखायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अयोध्या खटल्याचा आज निकाल असून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. कोर्टाचा निकाल स्वीकारून सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. 

रामजन्मभूमी विवादाचा निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे काळजावाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.