Mon, Jun 01, 2020 21:42
    ब्रेकिंग    होमपेज › National › 'ती' काँग्रेसला जोरदार टक्कर देईल; प्रज्ञासिंहांच्या उमेदवारीचे पंतप्रधान मोदींनी केले समर्थन 

'ती' काँग्रेसला जोरदार टक्कर देईल; प्रज्ञासिंहांच्या उमेदवारीचे पंतप्रधान मोदींनी केले समर्थन 

Published On: Apr 20 2019 9:29AM | Last Updated: Apr 20 2019 9:32AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून दिलेल्या उमेदवारीवरून विरोधक टीका करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. ''हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांसाठी ती प्रतीक आहे. ती काँग्रेसला जोरदार टक्कर देईल.'' असे पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

जहाल हिंदूत्वाच्या पुरस्कर्त्या असलेल्या साध्वी यांना भोपाळमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. त्या आता भोपाळमधून दिग्विजय सिंह यांच्याविरोधात दोन हात करणार आहेत.

ज्यांनी संपूर्ण धर्म आणि संस्कृतीचा संबंध दहशतवादाशी जोडला; त्यांच्यासाठी हा निर्णय (प्रज्ञा सिंहला उमेदवारी) एक उत्तर आहे, असा अप्रत्यक्ष टोला मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. एखाद्या मुद्यावरून प्रश्न आणि वाद निर्माण करणे ही काँग्रेसची कार्यपद्धती असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच सध्या सुरु असलेले आयकरचे छापे हे राजकीय हाडवैराचा भाग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या छाप्यातून भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले आहे, असाही दावा त्यांनी केला आहे.
भाजप पुन्हा बहुमताने सत्तेत येईल. सरकारला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अशोकचक्र सन्मानित दिवंगत कर्तव्यनिष्ठ आयपीएस अधिकारी आणि राज्यातील दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा एकेरी उल्लेख करत प्रज्ञा यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारींचे समर्थन केले आहे.