देशात एका दिवसात 7 बळी

Last Updated: Mar 27 2020 12:42AM
Responsive image


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता 27 राज्यांमध्ये धडकलेला आहे. गुरुवारी कोरोना संक्रमणाने 719 चा आकडा पार केला असून गुरुवारी दिवसाला आतापर्यंतचे सर्वाधिक 6 बळी गेले आहेत. 16 दिवसांत 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी पहिल्या घटनेत जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील 65 वर्षीय रुग्णाने अखेरचा श्‍वास घेतला. मुंबईतही दोन महिलांचा मृत्यू झाला. गुजरातेतील भावनगरात 70 वर्षीय वृद्धासह राजस्थानातील भिलवाड्यात एक रुग्ण मरण पावला. कर्नाटकात 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका 35 वर्षीय संक्रमिताचा मृत्यू झाला. इंदूरला गेल्या 24 तासांत नव्याने 10 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

बुधवारी तामिळनाडूतील मदुराईत, मध्य प्रदेशातील  उज्जैनमध्ये व गुजरातेतील अहमदाबादेत मिळून तीन जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. जम्मू-काश्मीरचे  मुख्य सचिव रोहित कंसल यांनी सांगितले की, मृत संक्रमित रुग्ण श्रीनगरातील हैदरपुर्‍यातील रहिवासी होता. त्याच्या संपर्कात आलेल्या 4 अन्य व्यक्‍तींनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मृत व्यक्‍ती 7 मार्च ते 21 मार्चदरम्यान दिल्ली आणि सहारनपूरला गेलेली होती आणि ती 7 ते 9 मार्चदरम्यान निजामुद्दीन मशिदीत राहिली. नंतर 9 मार्चला रेल्वेने ती देवबंदला गेली. 

11 मार्चपर्यंत हा रुग्ण दारुल उलेममध्ये मुक्‍कामी होता. नंतर 11 मार्चला रेल्वेने जम्मूत आला. इथे 12 तेे 16 मार्चदरम्यान पुन्हा एका मशिदीत मुक्‍कामी राहिला. 16 मार्चला तो  इंडिगो विमानाने जम्मूहून श्रीनगरला पोहोचला. 18 मार्चपर्यंत सोपोरमध्ये थांबला. 21 मार्चला आपल्या घरी हैदरपुर्‍यात परतला. प्रकृती बिघडल्याने त्याला 22 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मदुराई येथील मृताला बर्‍याच दिवसांपासून मधुमेह आणि रक्‍तदाबाचा आजार होता. त्याच्या रूपात कोरोनाचा हा तामिळनाडूतील पहिला बळी आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांपैकी 9 जणांना मधुमेह, रक्‍तदाब आदी आजार आधीपासून होते.