Wed, Sep 18, 2019 21:38होमपेज › National › 'एनडीए'ची डिनर पार्टी; सत्ता स्थापनेची खलबते रंगणार 

'एनडीए'ची डिनर पार्टी; सत्ता स्थापनेची खलबते रंगणार 

Published On: May 20 2019 8:36PM | Last Updated: May 20 2019 8:36PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. आता विरोधकांबराबेरच भाजपकडून आगामी रणनिती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 'एनडीए'तील मित्रपक्षांसाठी निकालापूर्वी उद्या, मंगळवारी दिल्लीत डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. त्यासाठी एनडीएतील घटकपक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा स्वतः उपस्थित राहणार असल्याचे समजते. एनडीएमध्ये भाजपसह शिवसेना, अण्णा द्रमुक, संयुक्त जनता दल (जेडीयू), शिरोमणी अकाली दल हे प्रमुख पक्ष आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यासह एनडीएतील इतर नेते दिल्लीतील डिनर भेटीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तामिळनाडूतील भाजप युनिटने दिली. 

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच लोकसभेच्या ५४२ जागांच्या एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. आठ एक्झिट पोलपैकी सहा एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा सरकार स्थापनेचे वेध भाजपला लागले आहेत. त्यासाठी अमित शहा यांच्याकडून एनडीएतील मित्रपक्षांना भोजनाच्या निमित्ताने एकत्र आणले जात आहे. भोजनाचे आमंत्रण हे केवळ औचित्य असले तरी या दरम्यान पुढील रणनिती ठरविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे निकालापूर्वी काँग्रेसनेही महत्वाची बैठक बोलावली आहे. यासाठी विरोध पक्षांतील नेत्यांना आमंत्रित केले आहे.