Tue, Jul 07, 2020 20:43होमपेज › National › निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब

निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब

Published On: May 21 2019 10:57AM | Last Updated: May 21 2019 10:57AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व सभा, रॅलीच्या घडामोडी देणारे आणि भाजपाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जात असलेले  ‘नमो टीव्ही’ हे चॅनल दूरचित्रवाणीवरुन गायब झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी अखेरच्या टप्प्यातील प्रचार सभा थंडावल्या त्याचवेळी हे चॅनल बंद झाले होते.

गोपनीयतेच्या अटीवर, भाजप नेत्याने सांगितले आहे की,  "नमो टीव्ही लोकसभा निवडणुकीसाठी भाजप प्रचार मोहिमेचा एक माध्यम म्हणून आणले गेले आहे. निवडणूका संपल्याने आता याची गरज नाही. म्हणून निवडणुका संपताच नमो टी व्ही बंद करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हणजे २६ मार्च रोजी अचानक सुरू झालेले हे चॅनल सुरूवातीपासूनच  वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. नमो टीव्हीवर केवळ भाजपाशी संबंधित कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणे व सभा दाखवल्या जात होत्या.

 दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी विना परवानगी कोणताही कार्यक्रम नमो टीव्हीवर दाखविण्यास मनाई केली होती. नमो टीव्ही भाजपा चालवत असून त्यामुळे या टीव्हीवरील सर्व रेकॉर्डेड कार्यक्रम विना परवानगी दाखविता येणार नाही, असं आयुक्तांनी म्हटलं होते. परवानगी शिवाय दाखविण्यात येणारा सर्व कंटेन्ट या चॅनलवरून हटविण्याचे आदेशही देण्यात आले होते. 

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे चॅनल बंद करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर आयोगाने नमो टीव्हीवरुन मंत्रालयाकडे अहवाल मागून एक नोटीस जारी केली होती. मात्र मतदान झाल्यानंतर हे चॅनल अचानक गायब झाल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे.