होमपेज › National › राष्ट्रपतीपदासाठी 'युपीए'कडून  मीरा कुमार?

राष्ट्रपतीपदासाठी 'युपीए'कडून  मीरा कुमार?

By | Publish Date: Jul 21 2017 2:06PM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दलित नेते व बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसप्रणीत ‘संपुआ’ने कोविंद यांच्याविरोधात दलित चेहरा उभा करून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना ‘संपुआ’तर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार असल्याची माहिती सोमवारी सूत्रांनी दिली.

सर्वसहमतीच्या उमेदवारासाठी धर्मनिरपेक्ष चेहरा दिला, तर पाठिंब्याचा विचार करू, असे काँग्रेसकडून याआधी सांगण्यात आले होते. कोविंद हे फारसे चर्चेत नसलेले वा वादग्रस्त व्यक्‍तिमत्त्व नसले, तरी त्यांच्या नावाची निवड भाजपने एकतर्फी केली असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. कोविंद यांना पाठिंबा दिला जाणार की, त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला जाणार, हे आज काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले नाही. तथापि, 22 तारखेला होणार्‍या ‘संपुआ’च्या बैठकीत मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. ‘संपुआ’कडून मागील काही दिवसांत महात्मा गांधी यांचे पणतू गोपालकृष्ण गांधी, शरद पवार आदी नावे चर्चेत आलेली आहेत. पण पवार हे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या स्पर्धेत   नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले होते.