Wed, Nov 14, 2018 12:10होमपेज › National › मणिशंकर काँग्रेसमधून निलंबित; ‘नीच’शब्द भोवला

मणिशंकर काँग्रेसमधून निलंबित; ‘नीच’शब्द भोवला

Published On: Dec 07 2017 9:27PM | Last Updated: Dec 07 2017 9:34PM

बुकमार्क करा

नवी दिल्‍ली/सुरत : पुढारी वृत्तसेवा 

आपल्या वक्‍तव्यांनी नेहमीच वादात राहणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आज सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्याबाबत ‘नीच’ असा अपशब्द वापरला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर यांना मोदी यांची माफी मागण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे मोदी यांनी हा गुजरातचा अपमान असल्याचे म्हटले आहे. सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर काँग्रेसने मणिशंकर यांना पक्षातून निलंबित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गांधी परिवाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. त्यावर आपली प्रतिक्रिया देताना अय्यर यांचे ताळतंत्र सुटले. मोदी अतिशय नीच स्वरूपाची व्यक्‍ती असून त्यांच्याकडे कोणतीच सभ्यता नाही. अशा प्रकारचे राजकारण करण्याची काहीच गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांना काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची गरज काय होती, असा सवालही त्यांनी केला.     

पंतप्रधानांची माफी मागा : राहुल 

असभ्य भाषा ही काँग्रेसची संस्कृती नसून मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून वापरलेल्या शब्दांचे मी समर्थन करणार नाही. किंबहुना, काँग्रेस पक्ष आणि मी अशी अपेक्षा करतो की, त्यांनी मोदींबाबत वापरलेल्या शब्दाबद्दल माफी मागावी, असे म्हणत राहुल गांधींनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्‍तव्याचा निषेध नोंदवला. 

हा गुजरातचा अपमान : मोदी 

सुरतमधील सभेत नरेंद्र मोदी यांनी अय्यर यांच्या वक्‍तव्यावर जोरदार टीका केली. अय्यर यांनी आपल्याला उद्देशून वापरलेले शब्द म्हणजे गुजरातचा अपमान असल्याचे मोदींनी म्हटले आहे. उच्च-नीच हे देशाचे संस्कार नाहीत. माझ्यासारख्याने चांगले कपडे परिधान केल्याचे मुघल संस्कार असणार्‍यांना बघवत नाही. मी भलेही खालच्या जातीतला असेन, मात्र काम उच्च आहे, असे मोदी म्हणाले. गुजरातमध्ये पराभव दिसत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांचे संतुलन बिघडले आहे. मला भलेही त्यांनी नीच म्हटले असेल; पण कुणीही त्यांच्याविरोधात मर्यादांचे उल्लंघन करू नका, असेही आवाहन मोदी यांनी केले.