Tue, Jul 07, 2020 07:17होमपेज › National › अखेर दिदी नरमल्या : डॉक्टरांच्या मागण्या केल्या मान्य, संप मागे

पश्‍चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप मागे

Published On: Jun 17 2019 7:23PM | Last Updated: Jun 18 2019 12:54AM
कोलकाता ः वृत्तसंस्था

गेल्या सात दिवसांपासून पश्‍चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपावर तोडगा निघाल्याने अखेर सोमवारी डॉक्टरांनी हा संप मागे घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळामध्ये यशस्वी चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी पुरेशा सुरक्षेचे आश्‍वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यात व अन्यत्रही वैद्यकीय सेवा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

10 जूनला कोलकात्याच्या एनआरएस हॉस्पिटलमध्ये एका वृद्ध रुग्णाच्या नातेवाईकांनी दोन कनिष्ठ डॉक्टरांना मारहाण केली होती. त्यानंतर प. बंगालमधील डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर गेले आणि त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरले. ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना संप मागे घेण्यास चार तासांचा अल्टिमेटम देऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्याने हा प्रश्‍न चिघळला होता. मुख्यमंत्र्यांशी आम्ही बंद खोलीत चर्चा करणार नाही, अशी भूमिकाही डॉक्टरांनी घेतली होती. त्यावर अखेर सोमवारी तोडगा निघाला. 

ममता बॅनर्जी यांनी राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले व मीडियासमोरच ही चर्चा होईल, असे आश्‍वासन दिले. दोन प्रादेशिक वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसमोर ही चर्चा झाली. यावेळी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. काम करीत असताना आम्हाला भीतीच्या छायेत राहावे लागते, असे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रत्येक रुग्णालयात पोलिस तैनात केले जातील. प्रतिनिधी मंडळाने हल्‍लेखोरांना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी हल्ल्याशी संबंधित पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच कोणत्याही डॉक्टरविरुद्ध राज्य सरकार खटला दाखल करणार नसल्याचेही सांगितले. 

तक्रार निवारण केंद्र उभारणार

प्रत्येक सरकारी रुग्णालयात तक्रार निवारण केंद्रही उभे केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. बंगाल डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष अर्जुन सेनगुप्ता यांनी सांगितले, आम्ही राज्यात निर्माण झालेली कोंडी फोडून राज्यातील वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू करीत आहोत.