Thu, Sep 19, 2019 03:25होमपेज › National › ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत?

ममता बॅनर्जींना नकोय मुख्यमंत्रिपद!

Published On: May 25 2019 7:48PM | Last Updated: May 25 2019 7:48PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरही राजकीय नाट्य संपण्याची चिन्हे नाहीत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दल आणि केंद्र सरकार त्यांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला आहे. 

शनिवारी लोकसभा निवडणुकीत जागा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बोलताना त्या म्हणाल्या, "मी बैठकीत सुरुवातीलाच सांगितले की मी आता मुख्यमंत्रिपद सांभाळू इच्छित नाही." दरम्यान, तृणमूलच्या नेत्यांनी राजीनामा मंजूर केला नसल्याचे वृत्त आहे. 

ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा दलांवरही आरोप केले. केंद्रीय सुरक्षा दलाने माझ्याविरोधात काम केले. आणीबाणीसदृश्य स्थिती निर्माण केली. हिंदू-मुस्लिमांच्या नावावर मत विभाजन केले. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, परंतु, त्यांनीही काही केले नाही, असे ममता म्हणाल्या. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. भाजपने राज्यात चांगली कामगिरी करताना 18 जागा जिंकल्या. मात्र तृणमूल काँग्रेस आपल्या गतवेळच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकले नाही. 43.3 टक्के मतांसह तृणमूलला 42 पैकी 22 जागाच मिळाल्या.