Tue, Oct 24, 2017 16:59
29°C
  Breaking News  

होमपेज › National › ऑक्सिजन पुरवठा सुरू...पण तोपर्यंत गेला 60 मुलांचा बळी

ऑक्सिजन पुरवठा सुरू...पण तोपर्यंत गेला 60 मुलांचा बळी

Published On: Aug 13 2017 2:25AM | Last Updated: Aug 13 2017 2:07AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली/लखनौ : वृत्तसंस्था

उत्तरप्रदेशातील गोरखपूरच्या बीआरडी या सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 60 पेक्षा जास्त मुलांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. हे मृत्युसत्र 7 ऑगस्टपासून सुरु असून याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाने वेळीच योग्य ते पाऊल न उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून ते सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहेत. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारने बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई केली असून आणखी जे कोणी या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावरही तातडीने कारवाई करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या 48 तासांत 30 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याचे गोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी शुक्रवारी सांगितले असले तरी हॉस्पिटलच्या बालरोग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 7 ऑगस्टपासून वेगवेगळ्या आजारांमुळे हॉस्पिटलमध्ये 60 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सिध्दार्थनाथ सिंग यांनी दिली आहे. या दुर्घटनेत हॉस्पिटलचे जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. जिल्हाधिकार्‍यांनी मुलांच्या मृत्यूचे निश्‍चित कारण दिले नसले तरी अपुर्‍या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे किमान 21 मुलांचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलमधील सूत्रांनी सांगितल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. यावेळी हॉस्पिटलचे अधिकारी जाग्यावर नव्हते. मुलांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा जिल्हा प्रशासन शोध घेत असल्याचेही ते म्हणाले.  दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अशुतोष टंडन यांनी या दुर्घटनेची मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरिय चौकशी सुरु असून गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडीकल कॉलेजच्या प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र आपण अगोदरच राजीनामा दिल्याचा दावा प्राचार्यांनी केला आहे. गेल्या 48 तासात या हॉस्पिटलमध्ये सुमारे 30 मुलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नवजात वॉर्डात 17, तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम वॉर्डात 5 तर जनरल वॉर्डातील 8 मुलांचा समावेश आहे.