गुजरातमधील मजूर पायी चालत गावाकडे

Last Updated: Mar 27 2020 12:40AM
Responsive image


अहमदाबाद : वृत्तसंस्था

कोरोना व्हायरस आणि लॉक डाउनमुळे देशातील लाखो मजुरांसमोर रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गुजरातमध्ये मोलमजुरी करणार्‍या राजस्थानमधील कामगारांनी तर चालतच आपल्या घरची वाट धरली आहे. वाहतुकीचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे हे कामगार बायका- मुलांसह शेकडो किलोमीटरची पायपीट करीत आहेत. विशेषतः लहान मुलांचे खूपच हाल होत आहेत. 

गुजरातमध्ये बांधकामावर काम करण्यासाठी राजस्थानातून मोठ्या प्रमाणात मजूर आले आहेत. कोरोना आणि लॉक डाउनमुळे सध्या सर्व काम बंद असल्याने त्यांच्या ठेकेदाराने त्यांना पैसे देण्यास नकार दिला आहे. काम नाही तर पैसेही नाहीत, असे त्यांनी या कामगारांना सांगितले. आमच्या जवळ जे काही थोेडेफार पैसे शिल्लक आहेत, ते देखील संपत चालले आहेत. घरातील चूल बंद आहे. हातात पैसा नाही, रोजगार नाही, अशा परिस्थितीत इथे राहून करायचे काय?  असा आमच्या समोर प्रश्‍न आहे. त्यामुळे येथून बाहेर पडण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्गच नाही, असे काही मजुरांनी सांगितले. गुजरातमधून राजस्थानला बसने अथवा रेल्वेने जाण्यास साधारणपणे 12 ते 15 तास लागतात. सहाशे किलोमीटरपेक्षा जादा अंतर आहे. इतका लांबचा प्रवास पायी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या सर्वांना रस्त्यात जागोजागी पोलिसांकडून जेवणाची व्यवस्था केली जात आहे. गुजरातबरोबरच दिल्लीतूनही अनेक मजूर कुटुंबीयांसह उत्तर प्रदेश, बिहारला आपल्या गावी पायी चालत निघाले आहेत. 

दरम्यान, दिल्लीतही बिहार आणि प. बंगालमधील अनेक मजूर अडकून पडले आहेत. पैसे मिळविण्यासाठी हे मजूर दिल्लीत येऊन एका रूममध्ये सहा-सात जण दाटीवाटीने राहात आहेत. यातील काही मजुरांनी सांगितले की, रोज बारा-बारा तास मजुरी करून आम्हाला महिन्याकाठी दहा-बारा हजार रुपये मिळतात. स्वतःचा खर्च चालवून पुन्हा गावाकडे असलेल्या पत्नी आणि मुलांना पैसे पाठवावे लागतात. शासनाने रस्त्यावर  गर्दी करू नका, योग्य अंतर राखा, असे सांगितले आहे. मात्र आम्ही छोट्याशा खोलीत इतके जण राहतो. अक्षरशः नरकयातना आमच्या वाट्याला आली आहे. गावी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. रोजगार बंद असल्याने हातात पैसा नाही, अशा  अवस्थेत जगायचे तर कसे, असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे, अशा शब्दांत काही जणांनी आपली व्यथा मांडली.