Mon, Jan 27, 2020 11:50होमपेज › National › झारखंडमध्ये जादू टोण्याच्या संशयावरून चौघांची हत्या

झारखंडमध्ये जमावाकडून चौघांची हत्या

Published On: Jul 21 2019 3:20PM | Last Updated: Jul 21 2019 3:20PM
गुमला : पुढारी ऑनलाईन

देशात मॉब लिंचिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्‍याचे दिसून येत आहे. काल (शनिवार) झारखंडच्या गुमला जिल्‍ह्‍यात मॉब लिंचिंगची घटना घडल्‍याचे समोर आले. या घटनेत जादू टोणा केल्‍याच्या संशयावरून चार लोकांना मारहाण करण्यात आली. यानंतर या चौघांची गळा चिरून हत्‍या करण्यात आली. ही घटना सिसकारी गावामध्ये घडली. शनिवारी रात्री १० ते १२ लोकांनी चार पीडितांना त्‍यांच्या घरातून बाहेर काढून त्‍यांना अमानुष मारहाण केली आणि यानंतर त्‍यांची हत्‍या करण्यात आली.

गुमलाचे पोलिस अधिकारी अंजनी कुमार झा यांच्या माहितीनुसार प्राथमिक तपासात या घटनेत मृत्‍युमुखी पडलेले लोक जादूटोणा करत असल्‍याचे समोर येत आहे. अंध विश्वासातून या घटनेत चौघांचा जीव घेण्यात आला. गावकर्‍यांनी या हत्‍याकाडांच्या आधी गावात एक पंचायत घेतली होती. यामध्ये या चौघांवर जादूटोणा करण्याचा आरोप लावण्यात आला होता. 

या घटनेनंतर या प्रकारात सामिल असलेल्‍यांनी येथून पलायन केले आहे. हत्‍या झालेल्‍या चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये फगनी देवी (65 वर्षे), चंपा भगत (65), सुना भगत (65) आणि पेटी भगत अशा चौघांचा समावेश आहे. या घटनेनंतर झारखंड पोलिसांनी गावात बंदोबस्‍तात वाढ केली आहे. पोलिसांनी घटनेच्या तपासाला सुरूवात केली असून, या प्रकरणातील अनेक लोक घराला कुलुपे घालून पळून गेल्‍याचे समोर आले आहे. 

स्‍थानिक लोकांनी दिलेल्‍या माहितीनुसार लाठ्‍या काठ्‍या आणि धारदार शस्‍त्रे घेवुन आलेल्‍या लोकांनी तीन घरांचे दरवाजे उघडवायला भाग पाडून या घरातील चार लोकांना बाहेर काढले. यावेळी बाहेर जमलेल्‍या लोकांनी या चौघांना पकडून एक ठिकाणी नेले आणि त्‍यांना काठ्‍यांनी जोरदार मारहाण केली आणि यानंतर चौघांचा गळा चिरून त्‍यांची हत्‍या करण्यात आली.