Thu, Sep 21, 2017 23:18
30°C
  Breaking News  

होमपेज › National › पाकिस्तानच्या चार सैनिकांचा सीमेवरील धुमःश्‍चक्रीत खात्मा

पाकिस्तानच्या चार सैनिकांचा सीमेवरील धुमःश्‍चक्रीत खात्मा

Published On: Jul 18 2017 2:29AM | Last Updated: Jul 18 2017 2:29AM

बुकमार्क करा


श्रीनगर ः वृत्तसंस्था

सीमेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानच्या सैनिकांना अद्दल घडविण्याचा डाव भारतीय लष्कराने आखला आहे. सीमेवर कुरघोडी करू इच्छिणार्‍या चार पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात एक जवानासह सात वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.

दरम्यान, सीमेवरील शांततेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक ले. जनरल ए. के. भट्ट यांनी पाकिस्तानच्या सहपदस्थास दिला आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून सोमवारी पाकिस्तानने दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्‍लंघन केले आहे. सीमेवर आगळीक करण्यास आलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या वाहनास जवानांनी टार्गेट केले. या कारवाईत चार पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याच्या वृत्तास पाकिस्तानने दुजोरा दिला आहे. यावेळी गोळीबारात एक जवान शहीद झाला असून, सीमारेषेवरील गावात राहणार्‍या सात वर्षांच्या चिमुरडीचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात सैन्यात नाईकपदावर काम करणारे मुद्दसर अहमद हे शहीद झाले. अहमद हे जम्मू-काश्मीरच्या त्राल भागातील रहिवासी होते. अहमद यांना दोन मुले आहेत. पूंछमध्येही पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्‍लंघनात सात वर्षांच्या साजिदा काफीलचा मृत्यू झाला. पूंछमधील बालाकोट येथे साजिदा आणि तिचे कुटुंबीय राहत होते.