Tue, Aug 20, 2019 15:12होमपेज › National › गगनयान मोहीम : हवाई दल देणार १० वैमानिकांना प्रशिक्षण

गगनयान मोहीम : हवाई दल देणार १० वैमानिकांना प्रशिक्षण

Published On: Feb 11 2019 3:49PM | Last Updated: Feb 11 2019 3:49PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशाच्या अंतराळ संशोधनातील मैलाचा दगड ठरणार असलेल्या गगनयान मोहिमेच्या तयारीसाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीय हवाई दलाला महत्त्वपूर्ण  जबाबदारी दिली आहे. पहिल्या गगनयान मोहिमेसाठी इस्रोने भारतीय हवाई दलाला १० जणांची निवड करून त्यांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी दिली आहे. आता गगनयान मोहिमेसाठी टीम तयार करण्याची जबाबदारी भारतीय हवाई दलावर असणार आहे. 

इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, की आम्ही टीम निवडण्यासाठी नियम आणि अटी निश्चित केल्या होत्या आणि त्यानुसार हवाई दलाला ती यादी देण्यात आली आहे. हवाई दलाला टीमची निवड आणि ट्रेनिंगचे सर्वाधिकार दिले आहेत. 

निवडलेल्या टीमचे ट्रेनिंग दोन टप्प्यात होणार आहे. त्यामधील पहिले ट्रेनिंग भारतीय हवाई दलाच्या बंगळूर येथील एरोस्पेस मेडिसीन संस्थेमध्ये होणार आहे, तर अंतिम टप्प्यातील ट्रेनिंग विदेशात होईल. सिवान यांनी गगनयान मोहिमेसाठी १० जणांमधून अंतिम तीन जणांची निवड करणार असल्याचे सांगितले. 

विदेशातील ट्रेनिंगसाठी रशिया आणि फ्रान्सचा विचार सुरू आहे, पण अंतिम निर्णय झाला नसल्याचे सिवान म्हणाले. बेंगळूरुमधील हवाई दलाची एरोस्पेस मेडिसीन लष्करी दलाच्या वैद्यकीय सेवेशी संलग्न आहे. ही संस्था भारतातील आणि दक्षिण पूर्व आशियामधील एकमेव संस्था आहे जी एरोस्पेस मेडिसीनमध्ये संशोधन करते. पायलट ट्रेनिंग सुद्धा याच संस्थेतून होते.