Tue, Oct 24, 2017 16:55होमपेज › National › भारत-जपान संबंधांची ‘बुलेट ट्रेन’

भारत-जपान संबंधांची ‘बुलेट ट्रेन’

Published On: Sep 14 2017 2:17AM | Last Updated: Sep 14 2017 2:06AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर भारताला घनिष्ठ मित्र जोडण्याची मालिका सुरू ठेवली आहे. या मालिकेतील जपान हा एक देश आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांचा दोनदिवसीय भारतदौरा आहे. गुरुवारी ते गुजरातमध्ये ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. भारतासाठी जपानसोबतचे संबंध हे ‘बुलेट ट्रेन’प्रमाणे वेगवान आणि भक्कम असणार आहेत. भविष्यात दोन्ही देशांमधील हे संबंध विविध विकासकामांना चालना देणारे ठरणार आहेत.

आर्थिक विकासाचा धागा

भारत-जपान संबंधांमागे आर्थिक विकासाचा धागा गुंतला आहे. कारण, चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या योजनेला शह देण्यासाठी सुरू करण्यात येणार्‍या ‘एशिया-आफ्रिका ग्रोथ कॉरिडोर’मध्ये भारत-जपानचा महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे. या माध्यमातून आशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये विकास योजनांना चालना देण्याचे काम केले जाणार आहे. 

चीनची पोटदुखी

भारत आणि जपानमधील वाढते संबंध हे चीनसाठी पोटदुखी बनत आहेत. कारण, आशिया खंडामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला हे दोन देशच आव्हान देऊ शकतात. यामुळे या दोन्ही देशांचे एकत्र येणे चीनला आशियातील आपले स्थान डळमळीत झाल्यासमान वाटते. काही दिवसांपूर्वी भारत-अमेरिका आणि जपानच्या नौदलाने संयुक्त युद्धअभ्यास केला होता. यावर चीनने आगपाखड केली होती. चीनला भारत-जपान मैत्री नेहमीच खटकत आली आहे.

लहान देशांना आधार

भारत-जपान मैत्रीपूर्ण संबंधांचा आशिया खंडातील अनेक लहान देशांना मोठा आधार वाटतो. आशिया खंडातील व्हिएतनाम, फिलीपाईन्स यासारख्या देशांवर चीन नेहमी दादागिरी करत असतो. मात्र, चीनची ही दादागिरी मोडीत काढण्यासाठी भारत-जपान जोडी सक्षम आहे. तसेच हे दोन्ही देश विकासासाठी आपल्या मित्र राष्ट्रांना सढळ हाताने मदत करण्याचे धोरण ठेवतात. त्यामुळे अशा लहान देशांसाठी भारत-जपान मैत्री विकासाचे आणि संरक्षणाचे एक माध्यम आहे. 

कूटनीतीचे महत्त्व वाढणार

डोकलामच्या मुद्द्यावर जपान भारताच्या खंबीरपणे पाठीशी राहिला होता. अमेरिकेपाठोपाठ जपानने भारताची बाजू उचलून धरली होती. आता डोकलामचा विषय निवळल्यानंतर भारत आणि जपानमध्ये बैठक होत आहे. या बैठकीत भविष्यातील कूटनीतीवर चर्चा होणे स्वाभाविक आहे. तसेच जपान भारताला आधुनिक शस्त्रनिर्मिती अथवा पुरवठा करण्यासाठी यापूर्वी विचार करत होता. मात्र, आता या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

बुलेट ट्रेन ‘मेक इन इंडिया’ बनेल

सध्या जपानच्या तंत्रज्ञानावर भारतात बुलेट ट्रेन उभारली जाणार आहे. मात्र, भविष्यात भारतच अशा ट्रेन निर्यात करण्याचा विचार करत आहे. यासाठी भारतातील 300 अधिकारी जपानमध्ये बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे भविष्यात बुलेट ट्रेन ‘मेक इन इंडिया’ बनेल या विषयी विश्‍वास बाळगण्यास हरकत नाही.

मोदी-आबे यांची घनिष्ठ मैत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये जपानला वेगळे महत्त्व दिल्याचे लक्षात येते. कारण, बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी जपानचे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. मोदी यांच्या मैत्रीखातर जपाननेही भारताला तंत्रज्ञानासोबत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. दोन्ही देशांचे संबंध अधिक भक्कम करण्यावर या नेत्यांचे विशेष प्रयत्न असल्याचेही दिसून आले आहे. कारण आजवर या दोन्ही नेत्यांच्या तब्बल 10 वेळा भेटी झाल्या आहेत. यातून त्यांच्यातील परस्परसंबंध दृढ करण्याची वृत्ती दिसून येते.