Mon, Jan 27, 2020 10:44होमपेज › National › अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी; वडिलांना होणार दीड लाखांचा दंड

अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी; वडिलांना होणार दीड लाखांचा दंड

Published On: Jul 17 2019 12:39PM | Last Updated: Jul 17 2019 12:47PM
गांधीनगर (गुजरात) : पुढारी ऑनलाईन

आज २१ व्या शतकात भारत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. जगभरात स्त्री-पुरूष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात धक्कादायक बाब समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात राज्यातील ठाकोर समुदायाचा एक विचित्र निर्णय समोर आला आहे. दांतीवाडामध्ये अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जर अविवाहित मुलीने मोबाइल वापरला तर तिच्या वडिलांना दीड लाखांचा दंड भरावा लागणार आहे. 

गुजरातमधील दांतीवाडामधील ठाकोर समुदायाने हा नवीन नियम केला आहे. तसेच आंतरजातीय विवाहावरही बंदी घालण्यात आली आहे. जर ठाकोर समुदायातील मुलीने इतर जातीच्या मुलासोबत लग्न केल्यास दीड लाखांचा दंड द्यावा लागणार आहे. ठाकोर जातीमधील मुलाने इतर जातीच्या मुलीसोबत लग्न केल्यास दोन लाखांचा दंडाचा नियम करण्यात आला आहे. १४ जुलै रविवारी जगोल गावात झालेल्या ठाकोर समुदायाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींनी लक्षपूर्वक अभ्यास करावा यासाठी त्यांना लॅपटॉप, टँबलेट द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. या निर्णयाला ठाकोर समाजातील लोक संविधानाप्रमाणे मानतात. 

जिल्हा पंचायत समितीचे सदस्य जयंतीभाई ठाकोर म्हणाले की, आमच्या समाजाने सर्वांच्या सहमतीने हे निर्णय घेतले आहेत. तर, अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरवार बंदी घालण्याच्या निर्णयावर दहा दिवसानंतर पुन्हा बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर जर मुलींनी कुटुंबीयांच्या मनाविरूद्ध लग्न केल्यास गुन्हा मानला जाणार आहे. लग्नात होणारा अतिरिक्त खर्चांवर निर्बंध घालण्यासाठी डीजे आणि फटाके वापरण्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे. यामधून आर्थिक बचत होऊ शकते, असेही ते म्हणाले.

कोटडा, गागुडा, ओडवा, हरियावाडा, मारपुरिया, शेरगढ, तालेपुरा, रानडोल, रतनपुर, दनारी आणि वेलावास गावांमध्ये ठाकोर समुदायाचे हे नवे नियम लागू करण्यात आले आहे.