Wed, Nov 14, 2018 12:47होमपेज › National › गुजरात : प्रचाराच्‍या तोफा थंडावल्‍या

गुजरात : प्रचाराच्‍या तोफा थंडावल्‍या

Published On: Dec 07 2017 6:47PM | Last Updated: Dec 07 2017 6:47PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

गुजरात विधानसभा निवडणुकांच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील प्रचाराच्‍या तोफा आज थंडावल्‍या. गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. ९ डिसेंबरला पहिल्‍या टप्‍प्‍यात तर १४ डिसेंबरला दुसर्‍या टप्‍प्‍यातील मतदान होणार आहे. १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 

भाजपने १५० जागांचे लक्ष्‍य ठेवले आहे. गुजरातमध्‍ये १८२ जागा आहेत. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ २२ जानेवारी २०१८ ला संपणार आहे. गुजरातमध्‍ये भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आहेत. तर दुसरीकडे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचाही प्रभाव आहे. पाटीदार समाजाच्‍या आरक्षणासाठी हार्दिक यांनी आंदोलन छेडले आहे, त्‍यामुळे हार्दिक यांना पटेलांचे समर्थन आहे. पाटीदारांना नोकरी, शिक्षण हवे आहे, यासह इतर मागण्‍या हार्दिक यांनी सरकारकडे केल्‍या आहेत. दरम्‍यान, काँग्रेसने हार्दिक यांना गुजरातमध्‍ये सत्तेवर आल्‍यानंतर आरक्षण देण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. त्‍यामुळे काँग्रेस-हार्दिकचा हा फॉर्म्युला निवडणुकीत कितपत उपयोगी पडेल, हे निकालानंतरच पाहायला मिळणार आहे. 

दरम्‍यान, गुजरात निवडणुकीचे पडघम वाजताच भाजपने स्‍टार प्रचारकांच्‍या माध्‍यमातून सभा घेण्‍यास सुरुवात केली होती. यामध्‍ये उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासह पंतप्रधान मोदी यांनीही गुजरातमध्‍ये जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी तर गुजरातच्‍या महत्त्‍वाच्‍या ठिकाणांसह गावोगावी रॅली, बैठका आणि जनसभा घेतल्‍या. तर काँग्रेसही जनतेला भेटून त्‍यांचे समर्थन मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला.  

दुसरीकडे राहुल गांधी यांनी जनसभांच्‍या माध्‍यमातून जीएसटी, नॅनो कार, नोटाबंदीचा मुद्‍दा उपस्‍थित करत मोदी यांच्‍यावर आरोप केले. यानंतर प्रत्‍येक सभेमध्‍ये भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोपाच्‍या फैरीही झाडल्‍या. या सर्व आरोप-प्रत्‍यारोपानंतर विजयाची पताका कोणाच्‍या हाती येईल, हे निकालानंतरच समजणार आहे.