Thu, Apr 02, 2020 14:03होमपेज › National › शेतकर्‍यांबाबत सरकार पक्षपाती : राहुल गांधी 

शेतकर्‍यांबाबत सरकार पक्षपाती : राहुल गांधी 

Published On: Jul 12 2019 1:41AM | Last Updated: Jul 11 2019 11:27PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

श्रीमंतांना कोट्यवधीची कर्जे माफ केली जात असताना शेतकर्‍यांसाठी मात्र काहीही केले जात नाही. केंद्र सरकार शेतकर्‍यांबाबत भेदभाव करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान केला.  शेतकरी समस्यांचा मुद्दा उपस्थित करताना राहुल म्हणाले, सरकारने शेतकर्‍यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नाहीत. 

शेतकर्‍यांच्या भल्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही ठोस तरतूद केलेली नाही. वायनाडमध्ये मंगळवारी एका कर्जबाजारी शेतकर्‍याने आत्महत्या केली. वायनाडमध्ये बँकांकडून कर्ज घेतलेल्या 8 हजार शेतकर्‍यांना नोटिसा पाठवल्या असून त्यांची संपत्ती जप्त केली जात आहे. गत पाच वर्षांत भाजप सरकारने श्रीमंतांची 5.5 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली; मात्र शेतकर्‍यांसाठी काही केले नाही. शेतकर्‍यांना दिलेली आश्‍वासने सरकारने पूर्ण करावीत. माझा सरकारला आग्रह आहे की, त्यांनी रिझर्व्ह बँकेला केरळ सरकारच्या कर्ज स्थगन प्रस्तावावर लक्ष दिले पाहिजे, तसेच बँकेने शेतकर्‍यांना वसुली नोटीस पाठवून त्रास देऊ नये, याचीही काळजी घेतली पाहिजे.  यावर उत्तर देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकर्‍यांच्या दयनीय स्थितीसाठी गतकाळातील काँग्रेसचे सरकारच जबाबदार असल्याचे सांगितले. त्यानंतर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेत गोंधळास सुरवात केली.

राजनाथ सिंह म्हणाले, शेतकर्‍यांची वाईट स्थिती या 5 वर्षांत झालेली नाही. 70 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या दयनीय स्थितीला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसच्या काळात शेतकर्‍यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या. सरकारने 5 वर्षांत  हमीभाव वाढवला आहे, तितका कुठल्याच सरकारने वाढवला नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.