'कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १ कोटीची मदत'

Last Updated: Apr 01 2020 6:36PM
Responsive image
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना संसर्गग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य क्षेत्रातील कुठलाही कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका अथवा सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटीची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी यासंबंधी घोषणा केली. 

वाचा : 'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'

खासगी तसेच सरकारी रूग्णालयात कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. कोरोना संसर्गग्रस्तांची सुश्रूषा करणारे डॉक्टर सैनिकांप्रमाणेच देशाची रक्षा करीत आहे. संसर्गग्रस्ताचा उपचार करताना कुठलाही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला; तर त्याला सरकारकडून मदत दिली जाईल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.

वाचा : दिल्लीतील तबलिगी जमातीत गेलेल्या कोल्हापुरातील २१ जणांचा शोध लागला  (video)

वैद्यकीय कर्मचार्याच्या परिवाराची रक्षा करण्यासह त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कोरोना सोबत दोन हात करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कुठल्याही कर्मचार्याच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास त्यांनी सरकारला यासंबंधी माहिती द्यावी. तात्काळ त्यांना मदत पोहोचती केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. सर्वांना एकत्रित होवून या संसर्गाचा सामना करून त्यावर मात करायची असल्याचेही ते म्हणाले. 

वाचा : 'तबलिगी'च्या मेळाव्यातील पुणे विभागातील १८३ जणांची यादी प्राप्त

बुधवारपासून जवळपास ३७ हजार नोंदणीकृत मजूरांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रूपये जमा करण्यात येणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. 

नायब राज्यपालांकडून व्यवस्थेचा आढावा

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मुख्य सुरक्षा अधिकारी, दिल्ली पोलीस तसेच इतर पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दैनंदिन आढावा घेतला. यादरम्यान ​राजधानीतील वैद्यकीय तयारी, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, डिस्चार्ज मार्गदर्शिका, रूग्णालयाव्य​तिरिक्त विलगीकरण कक्ष तसेच लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजनांसंबंधी चर्चा केली. बैजल यांनी संसर्गग्रस्त भाग, क्वॉरंटाईन सेंटर्स, सार्वजनिक ठिकाणांना सॅनिटाईज करण्यासाठी अग्निशमन दलाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनाही संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहे.