Fri, Mar 22, 2019 23:59होमपेज › National › सावधान! तुम्हाला इन्कमटॅक्सबाबत मेल आलाय का? 

सावधान! तुम्हाला इन्कमटॅक्सबाबत मेल आलाय का? 

Published On: Jul 12 2018 2:29PM | Last Updated: Jul 12 2018 2:29PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

इन्कम टॅक्स रिटर्नसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जशी जवळ येईल तसे इंटरनेटवर खोट्‌या मेसेज आणि मेल्सना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून करदात्यांना आयकर विभागाच्या मेल आयडीसारख्याच असलेल्या मेलवरुन मेल येत आहेत. यामध्ये आयकर परतावा मिळवण्यासाठी नेट बँकिंगची माहिती विचारली जात आहे. अशी कोणतीही माहिती आयकर विभागाकडून कधीही विचारली जात नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती करदात्यांनी देऊ नये असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.  आयकर परतावा मिळण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१८ आहे.

याबाबत आयकर विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, खोट्या मेलबद्दल सावध राहण्याच्या सूचना विभागाच्या वेबसाईटवरुन दिल्या जातात. त्याचबरोबर करदात्यांना टेक्स्ट मेसेज करुनही ऑनलाईन फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सांगितले जाते. अनेकदा आयकर विभागाच्या मेलसारखेच दिसणारे मेल येतात. याला उत्तर देऊ नये तसेच बँक खात्याची माहिती देऊ नये असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

असे ओळखा खोटे मेल:

खोट्या मेल आयडीमध्ये आणि आयकर विभागाच्या मेल आयडीमध्ये थोडासा फरक आहे. यात खोट्या मेल आयडीमध्ये filling असा शब्द असून आयकर विभागाच्या अधिकृत मेल आयडीमध्ये efiling असा शब्द आहे. तसेच फायलिंग शब्दाच्या स्पेलिंगमध्येही फरक आहे. खोट्या मेल आयडीमध्ये फायलिगंच्या स्पेलिंगमध्ये डबल एल वापरले आहेत तर आयकर विभागाने एकच एल वापरले आहे. 

खोटा मेल : donotreply@incometaxindiafilling.gov.in. 

आयकर विभागाचा मेल : donotreply@incometaxindiaefiling.gov.in