Mon, Jul 06, 2020 10:58होमपेज › National › उमा भारती लालकृष्ण अडवाणींच्या चरणी!

उमा भारती लालकृष्ण अडवाणींच्या चरणी!

Last Updated: Nov 09 2019 4:02PM

उमा भारती आणि लालकृष्ण अडवाणीनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या राम मंदीर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.०९) ऐतिहासिक निर्णय देत २.७७ एकर जागा रामलल्ला विराजमानची असण्यावर शिक्कामोर्तब केले. हा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने दिला.

या निकालानंतर माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, मी अडवाणी यांच्या घरी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले आहे. कारण आज अडवाणी यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचले आहे. अडवाणी हीच ती व्यक्ती आहे ज्यांनी खोट्या धर्मनिरपेक्षता करणाऱ्यांना विरोध केला होता असेही उमा भारती म्हणाल्या.  मी सुद्धा या आंदोलनात सहभागी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या दैवी निर्णयाचे प्रत्येक समाजाने स्वागत केले आहे, असेही त्यांनी अडवाणी यांच्या भेटीनंतर सांगितले. 

अयोध्या प्रकरणी शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने वादग्रस्त जागा रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय घेतला. या शिवाय सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येतच ५ एकर पर्यायी जमीन देण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अयोध्येत राम मंदीर निर्माण करण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले.   

अडवाणींच्या 'रथयात्रा'ने मिळाली आंदोलनाला दिशा 

१९८९ साली देशात राम मंदिरावरून चांगलेच वातावरण तापले होते. तेव्हा अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमुळे आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळाली होती. यामुळेच १९८४ साली लोकसभेत फक्त दोन जागा असणाऱ्या भाजपने १९८९ मध्ये लोकसभेच्या ८६ जागा जिंकल्या होत्या. महत्वाची बाब म्हणजे ६ डिसेंबर १९९२ साली बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी अडवाणी आरोपी आहेत. याच प्रकरणी भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा आणि महंत नृत्यगोपाल दास हे देखील आरोपी आहेत. बाबरी प्रकरणी या सगळ्यांना जामीन मिळाला आहे.